हवामान शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
नवी दिल्ली – भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या पावसाचा आणि पुराचा कहर सुरू आहे. विशेषत: समुद्रकिनाºयाजवळ असणाºया राज्यांमध्ये आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये पाऊस आणि पुराच्या घटना वाढल्या आहेत. याच दरम्यान, समुद्रातील असामान्य हालचालींमुळे येत्या काही दिवसांत देशात वादळ, चक्रीवादळ, पूर आणि दुष्काळाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता एका हवामान तज्ज्ञाने वर्तवली आहे. यावर्षी, यास चक्रीवादळ २६ मे रोजी उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. त्याचवेळी चक्रीवादळ तौक्तेने गुजरातच्या किनारपट्टीवर धडक दिली होती.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या हवामान शास्त्रज्ञ स्वप्ना पानिकल यांनी सांगितले की, समुद्रातील भरती आणि इतर क्रियाकलाप उच्च-जोखीम असलेल्या महासागरातील घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवतात. हवामान बदलाशी संबंधित एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, १८७० च्या सुरुवातीपासून मुंबईच्या किनारपट्टीवर या सागरी घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांना समुद्राच्या पातळीतील चढ-उतारासाठी चांगली तयारी करावी लागेल, असा इशारा हवामान तज्ज्ञ स्वप्ना पानिकल यांनी दिला. त्या म्हणाल्या की, १८७० ते २००० दरम्यान जागतिक समुद्र पातळीत दरवर्षी १.८ मिमीने वाढ झाली आहे, जी १९९३ ते २०१७ दरम्यान ३.३ मिमी होऊन दुप्पट झाली आहे. हिमनद्या वितळल्याने आणि समुद्राच्या पाण्यावर उष्णतेचा परिणाम झाल्यामुळे समुद्राची पातळी वाढली आहे. महासागर वातावरणातील ९१ टक्क्यांहून अधिक उष्णता शोषून घेतात. पृथ्वीवरील इतर घटकांच्या तुलनेत त्यांची उष्णता क्षमता सर्वाधिक आहे. जागतिक सरासरी समुद्र पातळी वाढत आहे आणि अरबी समुद्रासह हिंदी महासागरात समुद्राची पातळी वाढण्याची अपेक्षा आहे.
२०५० पर्यंत हिंद महासागर क्षेत्रातील समुद्राची पातळीही १५ ते २० सेंटीमीटरने वाढण्याची शक्यता आहे आणि ही चिंतेची बाब आहे. शास्त्रज्ञ स्वप्ना पणिकल यांनी सांगितले की, समुद्राच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने आगामी काळात अनेक तीव्र चक्रीवादळांची शक्यता बळावली आहे. मिनिस्ट्री आॅफ अर्थ सायन्सचे माजी सचिव एम. राजीवन यांनी सांगितले की, ईशान्य मान्सून दरम्यान झालेली अतिवृष्टी हे दाखवते की भविष्यात अशी प्रकरणे वाढतील. हवामान बदलामुळे येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्याचवेळी, भारतीय मान्सूनवर हवामान बदलाच्या परिणामाचे निरीक्षण करणे हे संशोधन समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल यावर त्यांनी भर दिला.