देशभरात निवडणूक रणनीतीकार, म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी ‘देशाच्या राजकारणात ‘भाजप’ केंद्रस्थानी राहणार’, असे भाष्य केले. त्यावरून कुणाला हर्षानंद झाला, तर काहींना खेद वाटला; पण यात नवे असे होते तरी काय? देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप १९८९ पासून केंद्रस्थानीच आहे.
राजकारणाला अस्थिरतेचा शाप असल्याने त्याच्या यशापयशाबद्दल काही ठाम असा निष्कर्ष काढणे म्हणजे स्वत:लाच तोंडघशी पाडण्याचे आमंत्रण देण्यासारखे असते. तथापी कधी-कधी राजकीय नेत्यांसारखे ‘अच्छे दिन’ राजकीय अभ्यास करणाºया विश्लेषकांना, पत्रकारांना आणि निवडणुकीची रणनीती आखणाºया एखाद्या रणनीतीकारालाही येतात. विशेष करून एखादा रणनीतीकार जर राजकीय पक्षाला यशाची खात्री देऊन तसे निकाल देत असेल, तर तो रणनीतीकार राजकीय पक्षांसाठी जणू विधाताच ठरतो.
असा रणनीतीकार मग स्वत:ला राजकीय यशाचा अंदाज बांधणारा ‘चाणक्य’ समजू लागतो. राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख, राजकीय नेते यांच्यापेक्षाही आपल्याला राजकारण अधिक कळते. आपलेच राजकीय आराखडे बरोबर असतात, अशी हवा त्या यशस्वी रणनीतीकाराच्या डोक्यात जाते आणि तो आपण काही तरी नवाच शोध लावत आहोत, या थाटात वाटेल तसे राजकीय भाष्य करू लागतो. सध्या देशात यशस्वी राजकीय आराखडे बांधणारा रणनीतीकार म्हणून पुढे आलेल्या प्रशांत किशोर यांचे असेच काहीसे झालेले आहे.
भारतीय जनता पक्षासहित अनेक प्रादेशिक पक्षांची रणनीती आखणारा हा व्यक्ती काँग्रेस पक्षात जाऊन २०२४ साली होणाºया लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वी रणनीती आखून भाजप व मोदींचा पराभव होऊ शकतो हे दाखवून देण्यात इच्छुकहोता; पण पक्षाच्या ‘हायकमांड’पेक्षा आपला ‘डिमांड’ मोठा असतो, या थाटात वावरणाºया प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी जास्त महत्त्व दिले नाही. त्यामुळे ते बिथरले आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची ‘गोवा’ राज्यात होणाºया विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच आखण्याची जबाबदारी स्वीकारली.
त्याचाच एक भाग म्हणून गोव्यातील काँग्रेस ‘दे धक्का’ देण्याच्या रणनीतीनुसार त्यांनी काँग्रेस पक्षावरचा आपला राग व्यक्त करताना राहुल गांधींना ‘आरसा’ दाखविण्यासाठी भाजपवर भाष्य केले. ते करताना त्यांनी नवा राजकीय शोध लावल्याचा आव आणत जे विधान केले ते असे होते, ‘देशाच्या राजकारणात आता भाजप केंद्रस्थानी आला असून, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना वाटते, त्याप्रमाणे भाजपला सहजासहजी सत्तेवरून घालवता येणार नाही.’
एका खासगी बैठकीत केलेल्या त्यांच्या या भाष्यावर मग देशभरात चर्चा झाली; पण यात त्यांनी नवे काय सांगितले? हे भाष्य जर कोणी १९८० ते १९८५ साली केले असते, तर तो राजकीय शोध ठरला असता. भाजपचे युग व्हाट्सअॅप व फेसबुकच्या विद्यापीठांच्या तथाकथीत ज्ञानावर आणि राजकीय पक्षांच्या दिशाभूल करणाºया ‘आयटी सेल’च्या खोट्या व द्वेषपूर्ण माहितीवर पोसले गेलेल्या अंधभक्तीवादी विश्वासवाद्यांचे असल्याने त्यांना मात्र हा शोध नवा वाटू शकतो. म्हणूनच प्रशांत किशोर यांच्या भाष्याची ‘दखल’ घेऊन भाजपच्या देश केंद्रीत राजकारणाचा इतिहास मांडणे महत्त्वाचे ठरते.
१९५१ सालचा ‘जनसंघ’ नवे रूपडे घेऊन १९८० साली ‘भाजप’ या नावाने राजकारणात उतरला. तो १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत पुरता साफ झाला होता. गांधीवादी समाजवाद मांडणाºया भाजपने तेव्हा हिंदुत्ववादाला तिलांजली दिली होती. त्याच काळात उत्तर प्रदेशात विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचा विषय काढून हिंदू भावना आणि श्रद्धांना हात घातला होता. पण भाजप त्यापासून ठराविक अंतर ठेवून होता. महाराष्ट्रात मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजकीय व्यासपीठावरून ‘हिंदुत्वाला’ राजकीय रूप देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवून यश मिळवायला सुरुवात केली होती. ज्या भाजपने शिवसेना मराठी माणसांची व हिंदुत्वाची भाषा करते, म्हणून जातीयवादी-धर्मवादी ठरवून युती फोडून शरद पवारांबरोबर सुत जुळवले होते, तीच भाजप पुन्हा हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तडफडू लागली होती.
१९८६ साली भाजपचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे गेले आणि त्यांनी तेजतर्रार प्रमोद महाजन यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवून पक्षाचे मुक्तपणे काम करण्याचे स्वातंत्र दिले. शिवसेनेने घेतलेले ‘हिंदुत्व’ भाजपने जनसंघाचा विचार करून पुन्हा स्वीकारून शिवसेनेसोबत युती करावी आणि विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिर आंदोलनाला भाजपने पाठिंबा द्यावा, असे भाजपला संजीवनी देणाºया दोन महत्त्वाच्या मुद्यांवरून प्रमोद महाजन यांनी पक्षात खल सुरू केला आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत तो मंजूर करून घेतला. पुढे भाजप अध्यक्ष अडवाणी यांनी याच मुद्यावर आपले राजकारण पेटवले आणि १९८९ साली शिवसेनेसोबत युती करून भाजपने हिंदुत्ववादाचा राजकीय अजेंडा स्वीकारला, असा देशाला संदेश दिला. भाजप देशाच्या राजकारणात ‘केंद्रस्थानी’ आला, तो तेव्हापासून.
शिवसेनेचं हिंदुत्व भाजपला यश देऊन गेलं. भाजपला प्रथमच लोकसभेत ८५ खासदारांचा आकडा गाठता आला. त्या बळावर त्यांनी व्ही. पी. सिंगच्या सरकारला पाठिंबा देऊन यापुढे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदु भाजपाईच असणार याचे संकेत दिले. शिवसेनेसारख्या मित्र पक्षांच्या बळावर भाजपने १९९८ ते २००४ या काळात देशाचे सत्ताकारण चालविले. या केंद्रबिंदुच्या यशाचे शिल्पकार होते ते अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यांनी घातलेल्या पायावरच २०१४ नंतरच भाजपच्या यशाचा कळस चढला, म्हणूनच भाजप आताच देशाच्या केंद्रस्थानी आली, असं म्हणणं संभ्रम निर्माण करणारे ठरते.
विजय सामंत/ दखल