- अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका
- रोजगाराच्या शोधात तरुणांचे स्थलांतर
नवी दिल्ली – देशातील रोजगाराबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील बेरोजगारी तब्बल १०.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या नऊ आठवड्यांमधील बेरोजगारीचा हा उच्चांक आहे. दरम्यान दुसरीकडे ग्रामीण बेरोजगारीमध्ये देखील वाढ झाली असून, ग्रामीण बेरोजगारी ७.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने (सीएमआयई) याबाबत अहवाल सादर केला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या अहवालानुसार सध्या नोकऱ्यांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र मागणीच्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होताना दिसत नाही. कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे शहरी भागातील नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर हा कमी असल्याचा दिसून येत आहे, मात्र पुढील तिमाहीत या चित्रामध्ये काही सकारात्मक बदल होऊ शकतात. रोजगाराचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात शहरातील बेरोजगारांमध्ये तब्बल ९ लाखांची भर पडली आहे, तर दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील रोजगार हे १२ लाखांनी वाढले आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रोजगार हे अधिक सुरक्षित आणि संघटीत मानले जातात, त्यामुळे ग्रामीण भागातील मुले देखील रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतर करत आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा टक्का वाढल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. हॉटेल, शिक्षण यांसारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे, तर दुसरीकडे कृषी, आयटी क्षेत्रातील रोजगार वाढल्याचे या अहवालामधून समोर आले आहे.