सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
नवी दिल्ली – कोरोना विषाणूपासून लवकरच सुटका होईल, अशी आशा वाटत असताना ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री झाली आणि जगभरात चिंतेचे वातावरण तयार झाले. ओमिक्रॉनमुळे यावर्षी पण ख्रिसमस आणि नववर्ष भीतीच्या सावटाखाली साजरे करावे लागत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू असल्याने हा वेगाने पसरतो आणि घातक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतात ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ६५३ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
देशातील ओमिक्रॉनबाधितांची सख्या ६५३वर पोहोचली आहे. त्यापैकी सर्वाधिक १६७ रुग्ण महाराष्ट्रात असून, त्यापाठोपाठ १६५ रुग्ण दिल्लीत आहेत. देशात एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण १८६ लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली पाठोपाठ केरळ ५७, तेलंगणा ५५, गुजरात ४९, राजस्थान ४६, तामिळनाडू ३४, कर्नाटक ३१, मध्य प्रदेश ९ आणि ओडिशामध्ये ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर देशातील इतरही काही राज्यांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आहेत, परंतु त्यांची संख्या कमी आहे. देशात गेल्या २४ तासांत ६ हजार ३५८ कोरोनाबाधित आढळले असून, ६ हजार ४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ७५ हजार ४५६वर असून, रिकव्हरी रेट ९८.४० टक्क्यांवर आहे.