देशातील आणखी १३ विमानतळ खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाणार

 

नवी दिल्ली – येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या विमानतळांचा ताबा सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) आहे, परंतु मार्च २०२२ पर्यंत या विमानतळांचा कारभार खासगी कंपन्यांच्या हातात सोपवला जाणार आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय चलनीकरण (नॅशनल मॉनिटायझेशन) योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आहे. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १३ विमानतळांचे खासगीकरण होणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही पीपीपी (सरकारी-खासगी भागीदारी) तत्वावर चालवण्यासाठीच्या १३ विमानतळांची यादी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत या विमानतळांची लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न केले जातील, असे संजीव कुमार यांनी सांगितले. संबंधित हवाई मार्गांवरील प्रत्येक प्रवाशापाठी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन विमानतळांचा लिलाव केला जाईल. यापूर्वी अशा पद्धतीने लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे संजीव कुमार यांनी नमूद केले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्याच महिन्यात १३ विमानतळांच्या खासगीकरणाला मंजुरी दिली होती. यामध्ये सात मोठ्या आणि सहा लहान विमानतळांचा समावेश आहे. केंद्र सरकारने २०२४ पर्यंत राष्ट्रीय चलनीकरण योजनेच्या माध्यमातून सरकारी मालमत्तांची विक्री करून ३६६० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खासगीकरण प्रस्तावित असलेल्या १३ विमानतळांमध्ये वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर आणि तिरुपती या सात बड्या विमानतळांचा समावेश आहे. तर लहान विमानतळांमध्ये रायपूर, औरंगाबाद, इंदौर, जबलपूर, त्रिची आणि हुबळी या सहा विमानतळांचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेंतर्गत येत्या चार वर्षांत देशातील एकूण २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये केंद्र सरकारने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम, मंगळुरू आणि गुवाहाटी या सहा विमानतळांचा कारभार पीपीपी तत्वावर अदानी समूहाकडे सोपवला होता, तर जुलै २०२१ मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबाही अदानी समूहाकडे गेला होता. ही सर्व विमानतळ पुढील ५० वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …