देशाच्या उभारणीसाठी

समता, बंधुता या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धांचे विचार पटले. तत्कालीन धर्म, कर्म आणि त्यातून होणारे शोषण याचा विचार करता शोषणमुक्त समाजासाठी त्यांना बौद्ध धर्माची विचारसरणी मनोमन पटली. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मशास्त्रीय चिकित्सापर लेखनात ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक अतिशय मौलिक आहे. निहिलेशन आॅफ कास्ट आणि बुद्ध अँड हिज धम्म ही एकमेकांना पूरक असून, ती एकत्रितपणे वाचली पाहिजेत. माणसामाणसातील भेदभावांच्या भिंती पाडून टाकण्याची ताकद या पुस्तकांमध्ये आहे.

सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेले प्रश्‍न पाहता डॉ. आंबेडकर यांचे सारे लेखन किती व्यापक होते, हे दिसून येते. महाराष्ट्राचे प्रश्‍न त्यांनी सहा दशकांपूर्वीच मांडून ठेवले होते. नुसते मांडले नव्हते, तर त्यावर उत्तर त्यांनी दिले होते. आज वर्तमान परिस्थितीत जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत, त्याचा उहापोह त्यांनी अगोदरच करून ठेवला आहे, हे आजच्या अभ्यासकांनी लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ एकच की फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास केला, लेखनाचा अभ्यास केला, तर देशाचे सगळे प्रश्‍न सहजपणे सुटतील. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येक विषयावर आपली विविध मते मांडली आहेत.
आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी कोणती मतं प्रमाण मानावीत, यावर डॉ. आंबेडकर यांनी फार मोठे मार्गदर्शन केले आहे. मी एकाच विषयावर परस्परविरोधी मते मांडली असतील, तर त्यातले जे सर्वात अलीकडचे असेल, ते प्रमाण मानावे. कालानुक्रमे त्याचा अग्रक्रम मांडा व तुम्ही या मताकडे पाहा, म्हणजे आपली आजची मते काळाच्या कसोटीवर कदाचित कालबाह्य होतील या विचारातून त्यांनी अनेक पर्यायी मतेही मांडून ठेवली होती, हे फार महत्त्वाचे आहे.

जेव्हा खूप सारे पर्याय असतात, तेव्हा सगळे कसे सुरळीत चालते. पर्याय असणे, म्हणजे एकाधिकारशाहीला रोखण्याची ताकद निर्माण होते, हे या मतातून स्पष्ट होते. बाबासाहेबांना ख‍ºया लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणतात ते यासाठीच. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेची केलेली निर्मिती म्हणजे तर परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घालण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यश मिळवले आहे. हा अतुलनीय कायदेशीर दस्तऐवज आहे. घटना परिषदेच्या इतिवृत्तांताच्या १२ खंडांमधून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिभेचे शेकडो पुरावे दिसून येतात. डॉक्टर आंबेडकरांनी अफाट मेहनत करून आपल्या मजबूत राज्यघटनेची निर्मिती केली. त्यातील बारकावे, खाचाखोचा पाहिल्या तर कोणाचेही मन अक्षरश: भरून येते. सर्वसमावेशक असा तो दस्तऐवज आहे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला अखंड ठेवण्यासाठी केलेला तो फार मोठा प्रयत्न आहे.
भारताला राष्ट्राचे स्वरूप यावे, म्हणून बाबासाहेबांनी भारतीयांपुढे अनेक गंभीर प्रश्‍न मांडले. बाबासाहेबांनी विचारले होते की, मनुस्मृती पाहिजे की राज्यघटना?, फार मोलाचा प्रश्‍न होता हा. याचे कारण त्यांनी स्पष्ट केले होते, ते म्हणाले होते की, राज्यघटनेचे टोक उत्तरेला आहे, तर मनुस्मृतीचे टोक दक्षिणेला आहे. याचा अर्थ दोन्ही व्यवस्था एकत्र चालू शकत नाहीत, म्हणजे मनुस्मृती ही विषमता शिकवते, द्वेष करणे शिकवते, वर्चस्व स्वीकारते, जबरदस्ती करते. मनुस्मृती काही जणांना, मूठभरांनाच अधिकार देते. उरलेल्यांना गुलाम करते. मनुस्मृतीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला जागा नाही. याउलट आपली राज्यघटना ही समता, बंधुता शिकवते. एकमेकांचा आदर करायला शिकवते. सर्व जण समान आहेत, त्यांचे अधिकार बरोबरीचे आहेत, हे राज्यघटना सांगते. मनुस्मृती हा काही धर्मग्रंथ नाही. मनुस्मृती तर सोशल कोड आॅफ कंडक्ट आहे. राज्यघटना हे सोशल कोड आॅफ कंडक्ट आहे. लवकरात लवकर मनुस्मृती वर्ज्य केली, तर आपण ज्या देवतांना मानतो, हिंदू धर्माला मानतो, त्यामुळे काही परिणाम होणार नाही, हे ज्या दिवशी लोकांच्या लक्षात येईल, त्या दिवशी देशाच्या उभारणीला सुरुवात होईल. बाबासाहेबांनी हा फरक सांगून देश उभारणीचा पाया घातला होता. आज देश घडवण्यासाठी या विचारावरूनच आपल्याला जावे लागेल. हा मार्ग दाखवणाºया बाबासाहेबांना त्यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त अभिवादन.

प्रफुल्ल फडके/विशेष लेख\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …