देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द; गोव्यात कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू – संजय राऊत

नवी दिल्ली – आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी वक्तव्य केले. उत्तर प्रदेशात सत्तांतर अटळ असल्याचे मत त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले.

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही जनमत विकू देणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी म्हणाले होते. त्यावर बोलताना बुधवारी संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेलेत. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिलेच असेल की, भारतीय जनता पक्षही फुटला. मंगळवारी एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झाटे यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत सुरू असलेले युद्ध पाहावे. प्रश्न नोटांचा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल, गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरून उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू. उत्तर प्रदेशात भाजपमधून काही नेते बाहेर पडल्यासंबंधी विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, भाजपमध्ये लागलेली गळती ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलनुसार, भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल असे सांगितले जात आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे, याची खात्री आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडतील?, असा सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही संजय राऊतांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडे आहेत, त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत, तरी त्यांची उंची कमी होत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …