दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग : भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी

सेंच्युरियन – भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर अखेर पावासने पाणी फिरवले आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. सोमवारी सकाळी खेळाला सुरुवात होण्याआधी सेंच्युरियनमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे सामना विलंबाने सुरू होईल असे वाटले. पाऊस थांबल्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सामना सुरू करण्याआधी मैदानाचे निरीक्षण करायचेही ठरवले, पण अधून-मधून पावसाचा खेळ सुरूच होता. अखेर पाऊस थांबणार नसल्याची चिन्हे दिसल्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरू शकले नाहीत. त्यामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. आता कसोटीचे फक्त तीन दिवस उरले असून, मंगळवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास आधी सुरू होणार आहे.

कसोटीत पहिल्या दिवशी रविवारी खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवले. दिवसअखेरीस भारताच्या ३ बाद २७२ धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावले असून तो (१२२) धावांवरून डाव पुढे सुरू करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे साथ देईल. रहाणे (४०) धावांवर नाबाद आहे.
मयांक अग्रवाल आणि राहुलने रविवारी पहिल्या गड्यासाठी १७ धावांची भागीदारी केली. त्यांच्या दमदार सलामीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आले. मयांकला (६०) धावांवर निगीडीने पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो (३५) धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता आल्यापावली माघारी परतला. या तिघांनाही निगीडीने बाद केले. निगीडी वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी दाद दिली नाही. दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलण्याचे भारताचे लक्ष्य होते, परंतु पावसाने यात व्यत्यय आणला त्यामुळे आजच्या खेळाकडे लक्ष लागून राहिले आहे.
ऑलिव्हियर दुसऱ्या कसोटीत खेळणार
सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुआन ऑलिव्हियर कोविड-१९ मुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू शकला नाही. मात्र दुसऱ्या कसोटीपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन खेळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऑलिव्हियर पहिल्या कसोटीत खेळणार होता, परंतु काही आठवड्यांपूर्वी कोविड-१९ च्या लागणमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनने कसोटी पदार्पण केले. आता डुआन ऑलिव्हियर बरा झाला आहे. ऑलिव्हियरने आतापर्यंत १० कसोटी सामन्यांत ४८ बळी घेतले आहेत. त्याने या वर्षात आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २८ बळी घेत चांगली कामगिरी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …