दुसऱ्या दिवशीही कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात संताप

मुंबई – बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अवमान झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह शिवेसना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. या आंदोलनावेळी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, तर मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना व मनसे रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तसेच या घटनेबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली.

दादरमध्ये पोलीस व शिवसैनिकांत झटापट
दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत चांगलीच झटापट झाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शांत केले.

ठाण्यात मनसे आक्रमक
या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पाहण्यास मिळाली. ठाण्यात मनसेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याला मनसेच्या वतीने जोडे मारत, शाई फासण्यात आली. मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंदरकरसह मनसे पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच विटंबना केलेल्या लोकांना अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

नवी मुंबई मराठा संघटनांनी केला निषेध
नवी मुंबईतही मराठा संघटनांनी या घटनेचा निषेध केला. अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींनी वाशीत निषेध आंदोलन केले. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटना वारंवार मराठी द्वेष दाखवत असल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंमत असेल, तर कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्या नागरिकाने महाराष्ट्रात येऊन दाखवावे त्याला इंगा दाखवू, असेही आव्हान कार्यकर्त्यांनी केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.

मुलुंड रेल्वे स्थानकावर घटनेचा निषेध
रविवारी मुलुंड रेल्वे स्थानकावर या घटनेच्या विरोधात मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले, तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेकही करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला, तसेच भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

नागपुरात युवा सेनेचा कर्नाटक सरकारला इशारा
उपराजधानी नागपुरात देखील या घटनेचे पडसाद उमटले आहेत. शहराच्या गांधी गेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकमधील भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून या घटनेच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान सहन करणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने याबाबत माफी मागावी अन्यथा कर्नाटकमधून बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कर्नाटकातील बसेस राज्यात आल्यास तोडफोड करू, असा इशाराही युवा सेनेकडून देण्यात आला आहे.

सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अमित शहांची भेट
दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रविवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. पुणे दौऱ्यादरम्यान सेनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती समजताच अमित शहा यांना स्वत: सेनेच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. अमित शहा यांचे पुण्यातील दिवसभरातील कार्यक्रम संपल्यानंतर ते भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या घरी रात्री जेवणासाठी गेले असता, तेथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …