मुंबई – भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या मालिकेतील कानपूर कसोटीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी २७ षटके खेळून काढताना सामना अनिर्णीत राखला. आता दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत आणि वानखेडे स्टेडियमवर आजपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. ५ वर्षांनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना होणार आहे आणि २५ टक्के प्रेक्षकक्षमतेला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. बुधवारी तिकीट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या ३० मिनिटांत सर्व तिकिटे विकली गेली. पण चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी भागांत बुधवारपासून पाऊस पडत आहे आणि पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान शास्त्र विभागानुसार आज (शुक्रवारी) ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर किंचितसा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ४ व ५ डिसेंबरलाही किंचितसे ढगाळ वातावरण असेल, ६ डिसेंबरला लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी दुसरी कसोटी रद्द होणार नाही, असेच चित्र आहे.
आतापर्यंत वानखेडेवर झालेल्या २५ सामन्यांपैकी ११ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७ मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत. सलग दोन दिवस बरसलेल्या पावसापासून वानखेडेच्या खेळपट्टीचे संरक्षण केले असले तरी उर्वरित मैदान उघडे असल्यामुळे खेळ सुरू झाला तरी कितपत षटके टाकता येतील, हे सांगणे शक्य नाही. वानखेडे नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल राहिले आहे, पण अवेळी बरसलेला पाऊस यावेळी वेगवान गोलंदाजांना सहाय्यक ठरू शकतो. त्यामुळे दोन्ही संघ वेगवान गोलंदाजांना पसंती देऊ शकतात. तसे झाल्यास भारताकडून केवळ दोन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले जाऊ शकते. आर.अश्विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यापैकी एकाच्या नावावर फुली मारली जाऊ शकते; पण कोणास वगळायचे या पेचात कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. याशिवाय कोहलीच्या परतण्यामुळे मधल्या फळीतून कोणाची गच्छंती होते, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …