दुखापतीवर मात करण्यासाठी रोहित-जडेजा ‘एनसीए’ मध्ये

मुंबई – भारताच्या टी-२०, एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)मध्ये दाखल झाले आहेत. एनसीएमध्ये या दोन्ही खेळाडंूच्या फिटनेसवर मेहनत घेतली जाणार आहे. जेणेकरून त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळता येईल. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहेत. २६ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान ही कसोटी मालिका होणार आहे.
रोहितची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. पण मुंबईत सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. त्याच्या जागी इंडिया-एचा कर्णधार प्रियांक पांचाळची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दुखापत झाल्यामुळे अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाही १८ सदस्यीय संघाचा भाग नाहीत. भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार यश धुलही या एनसीएमध्ये आहे. त्याने रोहित आणि जडेजा सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
२३ डिसेंबरपासून यूएईत आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी अंडर-१९ ची टीम एनसीएमध्ये सराव करीत आहे. मागच्या आठवड्यात रोहितची एकदिवसीय टीमच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा वेळ लागेल, असा अंदाज आहे. मायदेशात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहितने नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका सहज जिंकली. आता एकदिवसीय मालिकेसाठी सुद्धा तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजाला संघाबाहेर जावे लागले आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जडेजाची दुखापत बरी व्हायला बरेच महिने लागण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तर तो आयपीएल २०२२ साठी फिट होईल अंदाज वर्तविला जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …