मुंबई – राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णसंख्येला नियंत्रण घालण्यासाठी कंबर कसली आहे. दिवसाला २५ हजार कोरोना रुग्ण आढळले, तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठीचा महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची तयारी महापालिकेने केली आहे.
मुंबईत दररोज २० ते ३० टक्के रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या दररोज आढळणाऱ्या ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त ५ टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, मात्र संभाव्य वाढीमुळे १० टक्के रुग्णांना दाखल करावे लागले, तरी ३५ हजार बेडची सुविधा तैनात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आढळणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. २५ हजार रुग्ण दिवसाला आढळले, तर ही टक्केवारी दुप्पट होईल. म्हणजेच १० टक्के रुग्ण दाखल होतील, सध्याच्या घडीला ८२ टक्के बेड्स रिक्त असून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येणार असून, १ लाख बेड्स अॅक्टिव्ह होतील, तसेच रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे म्हणून डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
ऑक्सिजनचा पुरेसा साठा
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. केवळ १ ते २ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासत आहे. मुंबईच्या अंदाजित दिवसाच्या गरजेच्या तीन पट ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. रुग्णसंख्येत वाढ होऊन ऑक्सिजनची गरज लागली, तरी मुंबई महापालिकेकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.