- काँग्रेससह विरोधी पक्षांना एकत्र आणणार
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्यावर धोरण ठरवण्याबाबत बैठक होती. आगामी काळात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. कोविड काळात बेरोजगारी वाढली, व्यापार ठप्प झाले, लोकांना नुकसान झाले, महागाई वाढली यावरून आगामी काळात आंदोलन करणार असल्याचेही मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहे, लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे, देशात महागाई, धार्मिक भीती पसरवली जात आहे, याबाबत देशात पर्याय तयार केला जाणार, भाजपविरोधात सगळ्यांना एकत्र करून ताकद उभारली जाणार, लोकांना पर्याय हवा आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. उत्तर प्रदेशाबाबत अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणे सुरू आहे. तसेच गोवा, मणिपूरबाबतही चर्चा झाली असल्याचे मलिक म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढाई केली, पण काही लोक, ज्यांना भाजपचे समर्थन आहे, ते न्यायालयात गेले आणि देशात इतर राज्यात असलेला कायदा रद्द झाला अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. आम्ही मागणी केली केंद्राने याबाबत संशोधन करावे, आरक्षणाचा कायदा संसदेत आणावा असेही मलिक म्हणाले आहेत.