दिल्लीतील चित्र २०२४ साली पूर्णपणे बदलेल – संजय राऊत

पुणे – २०२४ साली दिल्लीतील चित्र हे संपूर्णपणे बदललेले असेल आणि हे मी तुम्हाला खात्रीशिरपणे सांगत आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या देशातील कोणतीही आघाडी ही काँग्रेसला सोडून होणार नाही. काँग्रेस हा या देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. काही राज्यांत त्यांची सरकार नसेल किंवा काही राज्यांत ते कमकुवत असले, तरी देशभरात रुजलेला हा पक्ष आहे. बाकी सगळे हे प्रादेशिक पक्ष आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. खासदार राऊत पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वांत मोठा पक्ष आहे, हा त्या पक्षाचा दावा आहे. त्यामुळे जगातला सर्वात मोठा पक्ष सत्तेतून पायउतार झाला, तरी त्या पक्षाचे अस्तित्व तर राहणारच. तो प्रमुख विरोधी पक्ष असेल. त्या पक्षाची ताकद आहे. १०५ आमदार असतानाही सत्ता नाही; पण ताकद आहे. ते दाखवत नाहीत हा भाग वेगळा. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ताकद राहील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
०००००००००००००००००००
महाराष्ट्राला बदनाम करत आहे
खासदार राऊत म्हणाले, एनसीबीतील अधिकाऱ्याने काही तरी चूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध ही लढाई सुरू आहे. क्रांती रेडकरसोबतची वैयक्तिक लढाई नाही. सध्या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येऊन आमच्या लोकांचा छळ करत आहे. महाराष्ट्राला बदनाम करत आहे. आमच्या मंत्र्यांच्या इतर लोकांच्या घरावर धाडी टाकत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला. भावना गवळी यादेखील मराठीच आहेत. पाचवेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का? तिचा छळ सुरू असताना, कोणी आवाज उठवत नाही. अजित पवारांचे नातेवाईक, त्यांच्या बहिणी मराठी नाहीत का? देगलूरची निवडणूक सुरू असताना, तुम्हाला अशोक चव्हाण यांच्या लोकांवर धाडी टाकण्याची बुद्धी सुचते. ते मराठी नाहीत का? अनिल परब मराठी नाहीत का? राज्यात सगळेच मराठी आहेत. त्यांचे रक्षण करणे, त्यांची प्रतिष्ठा सांभाळणे या सरकारचे काम आहे आणि आम्ही ते करतो, असे राऊत यांनी ठासून सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …