चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. दिनेश कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी दीपिकाने दोन मुलांना जन्म दिल्याची माहिती दिली. दिनेश कार्तिकने यावेळी पत्नी आणि मुलांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
हे फोटो शेअर करताना दिनेश कार्तिकने कॅप्शन दिली आहे की, आणि आम्ही आता तिघांचे पाच झालो आहोत. दोन सुंदर मुले आमच्या घरी झाली आहेत. यापेक्षा जास्त आनंदी आम्ही असू शकत नाही. कार्तिकने या पोस्टमध्ये मुलांची नावे देखील सांगितली आहेत. कबीर आणि झियान अशी त्यांची नावे आहेत. यानंतर सोशल मीडियावर कार्तिक आणि दीपिका यांचे अभिनंदन केले जात आहे. कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश खेळाडू आहे. वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी दीपिका पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. याशिवाय तिने अनेक एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकांची कमाई केली आहे. आयपीएल २०२१ मध्ये कार्तिक कोलकाताकडून खेळत होता. कोलकाताने यावेळी आयपीएलची फायनल गाठली होती. पण चेन्नईने २७ धावांनी कोलकाताचा पराभव करत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. कोलकाता संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असताना कार्तिक मात्र चांगली खेळी करू शकला नाही. १७ सामन्यांमध्ये त्याने फक्त २२३ धावा केल्या. तो अर्धशतकही करू शकला नाही.