दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

नवी दिल्ली – एकीकडे देशात कोरोनाच्या संकटाशी सामना सुरू असताना, दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून माकड उड्या सुरूच असल्याचे दिसून येते. सीमाभागात दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. हे प्रयत्न भारतीय जवानांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसतो. या सर्व मुद्यांवर भारताचे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या मुद्यावरून नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून, कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असे देखील नरवणे यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यादरम्यान बुधवारी १४वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये लष्करप्रमुख नरवणे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सीमाभागातील घुसखोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना जनरल नरवणे यांनी पाकिस्तानकडून सीमाभागत होत असलेल्या दहशतवादी कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली. पश्चिमेकडील सीमाभागात, विशेषत: नियंत्रण रेषेजवळ बराच काळ परिस्थिती तणावपूर्ण होती. सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे; पण तरी देखील या भागात दहशतवादी कारवाया वाढू लागल्या असून नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील शेजारी देशाचे सुप्त मनसुबे यातून उघड होत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही; पण आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. जर आम्हाला भाग पाडण्यात आले, तर याची गंभीर किंमत वसूल केली जाईल, अशा शब्दांत लष्करप्रमुखांनी दम दिला आहे. दरम्यान, यावेळी चीनकडील सीमारेषेवर देखील भारतीय लष्कर कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचे नरवणे यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडच्या सीमाभागात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आम्ही चर्चेच्या मार्गाने शांतता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तरेकडच्या सीमारेषेवर भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज आहे, असे नरवणे यावेळी म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …