ठळक बातम्या

दशकोटी लसीकरणाचा महाराष्ट्र!

जगभरात धुमाकूळ घालणाºया कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लसीचे महत्त्व अधोरेखित झाल्यावर जगभरात लसीकरणाची मोहीम उघडण्यात आली. भारतातही ती यशस्वीरित्या राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राने लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार पाडून आघाडी घेतलेय.

भारतात कोरोना महामारीचा सर्वात मोठा फटका बसला तो शहरीकरणाचा अफाट विस्तार होत गेलेल्या महाराष्ट्रालाच. २०१९च्या मार्च महिन्यात अचानकपणे उद्भवलेल्या या जागतिक महामारीला रोखण्यासाठी कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने या संसर्गजन्य साथीवर नियंत्रण ठेवणे एक मोठे आव्हानच होते. मुंबईसारख्या शहरासोबतच आजूबाजूच्या पट्ट्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत राहिल्याने आरोग्य व्यवस्था पुरत्या कोलमडून पडल्या. अशा परिस्थितीतही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला होता. राज्यातला विरोधी पक्ष सत्ता मिळविण्यासाठी कोरोना साथीचे भांडवल करून सरकार कसे पाडता येईल या विचाराने झपाटलेला होता, तर राज्यातले सत्ताधारी मंडळी केंद्र सरकार कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी राज्याला हवं तसं सहकार्य करीत नाही, अशा तक्रारी करत होता.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांचे सर्व व्यवस्थापन, डॉक्टर-नर्स, कम्पाऊंडर-सफाई कामगार आणि पोलीस या सर्वांनी संयुक्तरित्या जीवाचे रान करून मुंबई व आजूबाजूच्या पट्ट्यातील कोरोना संसर्गावर बºयापैकी मात करण्यात यश मिळविले. ज्याची दखल देशासहित आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. राज्यभरातील जिल्हा अधिकाºयांनीही तुटपुंज्या सोयी-सुविधा हातात असताना, दिवस-रात्र एक करून या साथीला आटोक्यात आणण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला.

कोरोना साथीच्या त्या धामधुमीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीच्या माध्यमातून जनतेशी चालू केलेला संवाद या लढ्यात उमेद देणारा होता; पण शब्दांचा आधार हा काही अशा संसर्गजन्य साथीवर रामबाण उपाय होऊ शकत नव्हताच. त्यासाठी आवश्यक होती ती म्हणजे ‘लस’ त्यासाठी जगभरात प्रयत्न चालू होते. अंतर ठेवणे, सतत हात धुणे, तोंडावर मुखपट्टी लावणे हे फक्त सुरक्षतेचे मार्ग होते, म्हणूनच तर लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधन अहवालाने, ‘जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस निर्माण होत नाही, तोपर्यंत या साथीवर १०० टक्के नियंत्रण मिळविणे अवघड आहे’, असे नमूद केले होते.
नियती आणि निसर्गाने लादलेल्या संकटावर मानवी जमातीने अथक प्रयत्न करून त्यावर मात केलेली आहेच, म्हणूनच तर देवी, पोलिओ, कांजण्या, स्वाइन फ्लू यांसारख्या दुर्धर समजल्या जाणाºया साथीवर शास्त्रज्ञांनी संशोधन करून ‘व्हॅक्सिन’ (लस)च्या माध्यमातून मानवी समाजाचे रक्षण करण्यात यश मिळविले. कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी तोच मार्ग निवडला गेला आणि शेवटी दिवस-रात्र अथक प्रयत्न करून कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविणारी ‘लस’ निर्माण करण्यात आली.

त्यानंतर नोव्हेंबर २०२०ला युरोप-अमेरिकेमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्याच क्षणी मानवी समूहाने नि:श्वास टाकला आणि जगभरात लसीकरण सुरू झाले. भारतात १६ जानेवारी, २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. त्याचवेळी मुंबईसह महाराष्ट्रातही पहिल्यांदा आरोग्य कर्मचाºयांसाठी नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी, ४५ वर्षे वयोगटांसाठी आणि १ एप्रिलपासून १८ वयोगटापासून ४४ पर्यंत असे लसीकरण सुरू झाले. त्यातही पुन्हा केंद्र सरकारची लस पुरविण्यात होत असलेली दिरंगाई, राजकीय उणीदुणी, केंद्र-राज्य वाद असे अडथळे आले ते वेगळेच.
अशा सर्व संकटांवर मात करत महाराष्ट्राने या मंगळवारी १० कोटींचा कोरोना प्रतिबंधक लसीचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची १२ कोटींच्यावर असलेली लोकसंख्या समोर ठेवून ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांना किमान पहिला डोस मिळावा, असे प्रशासनाला निर्देश दिले होते. तेच उद्दीष्ट समोर ठेवून राज्यातील सर्व जिल्हा अधिकाºयांनी पालिका व्यवस्थापकांनी व आरोग्य सेवा हाताळणाºया सर्व घटकांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच आज महाराष्ट्रात पहिला डोस घेतलेले ६ कोटी ९० लाखांवर व्यक्ती आहेत, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्याही ३ कोटी ३० लाखांच्या जवळपास गेलेय. अनेक अडथळे पार पाडत इतक्या वेगाने लसीकरणाचा एवढा मोठा आकडा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य आहे.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजच्या घडीला ९९ टक्के लोकांनी पहिला डोस घेतलाय, तर ६३ टक्क्यांनी दुसरा डोस पूर्ण केलाय. महाराष्ट्रासाठी हे सर्व अभिमानास्पद असलं, तरी कोरोना विषाणूचे संकट पूर्णपणे नष्ट झालेय, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. दोन्ही लस मात्रा घेतल्यावरही पुन्हा कोविड होण्याची शक्यता असते. तेव्हा इतर नियम पाळून काळजी घेण्याची सवय तशीच ठेवावी लागेल. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने केलेले लसीकरण या राज्यातून ही साथ पळविण्यास अग्रेसर ठरणार आहे, यात वादच नाही. म्हणूनच महाराष्ट्राने दश कोटी लसीकरणाचा ओलांडलेला आकडा ‘दखल’ घेण्यासारखाच आहे. त्याचे सर्वांनीच कौतुक करायला हवेच हवे!

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …