दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय

शारजा – डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात आपल्या आक्रमकतेचा शानदार नजराणा दाखवत सलग दोन षटकार ठोकले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी येथे श्रीलंकेवर चार विकेटनं रोमहर्षक विजय मिळवत टी-२० विश्वचषकातील आपल्या अपेक्षांना कायम राखले.

दक्षिण आफ्रिकेला १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या दोन षटकांत २५ धावा हव्या होत्या. कॅगिसो रबाडा (नाबाद १३)ने दुशमंत चामिरावर षटकार ठोकत अपेक्षा जागा केल्या. जेव्हा संघाला अखेरच्या षटकात १५ धावांची गरज होती, अशात मिलर (१३ चेंडूंत नाबाद २३)ने लाहिरू कुमारावर सलग दोन षटकार व रबाडाने विजयी चौकार ठोकत १९.५ षटकात ६ बाद १४६ धावा केल्या. त्यांच्या या विजयात कर्णधार तेंबा बावुमा (४६ धावा) याचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे, तर त्याआधी तबरेज शम्सी (१७ धावा ३ विकेट) व ड्वेन प्रिटोरियस (३ षटकांत १७ धावा) यांनी शानदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने या विजयाने श्रीलंकेचा सलामी फलंदाज पथुम निसांकाच्या उत्कृष्ट अर्धशतकीय खेळी व लेग स्पिनर वानिंदु हसरंगा (२० धावा ३ विकेट) याच्या हॅट्ट्रिकवरही पाणी फेरले. या सामन्यात श्रीलंकेच्या वतीने फक्त तीनच फलंदाज दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचले, ज्यात निसांकाने ५८ चेंडूंत ७२ धावा केल्या. त्यानंतरही श्रीलंका २० षटकांत १४२ धावाच करू शकली. दक्षिण आफ्रिकेचे या विजयाने ३ सामन्यांत ४ गुण झालेत. तसं पाहता, श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब राहिली. रिजा हँड्रिक्स (११) व क्विंटन डिकॉक (१२) तीन चेंडूंच्या आत माघारी परतला. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेची स्थिती २ बाद ४० धावा होती व त्यानंतर रॉसी वॉन डर डुसेन (१६) हा बावुमाच्या चुकीमुळे धावचीत झाला. त्यानंतर बावुमाला एडेन माक्रराम (१९)ने चांगली साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या ४ षटकांत ४१ धावा हव्या होत्या, अशात बावुमाने एक गगनचुंबी षटकार ठोकत लंकेवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पुढील षटकात हसरंगाने त्याला निसांकाकरवी झेलबाद केले. हसरंगाने प्रियोरियसला लाँगऑनवर झेल देण्यास भाग पाडत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. हसरंगा टी-० विश्वचषकात हॅट्ट्रिक पूर्ण करणारा तिसरा गोलंदाज आहे; पण मिलर व रबाडाने मात्र हसरंगाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. त्याआधी श्रीलंकेनेही हाकेच्या अंतरावर विकेट गमावत १४३ धावांचे आव्हान उभे केले होते. अनुभवी कुसाल परेरा (७)ला एनरिच नॉर्जेने त्रिफळाचीत माघारी धाडले, तर असालंका (२१), बी. राजपक्षे (०), अविष्का फर्नांडो (३), हसारंगा (४) व कर्णधार शनाका (११) जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …