जर आपल्याला इन्स्टाग्राम रिल्स बनवण्याचे वेड असेल, तर अलीकडेच तुम्ही सिंहली भाषेतील गाणे मानिके मागे हितेवर प्रचंड रिल्स पाहिल्या असतील, ज्यापैकी काहींचे व्ह्यूज हे तर करोडोच्या घरात जाऊन पोहोचले होते. या गाण्याला आपला आवाज देणारी श्रीलंकेची सिंगिंग सेन्सेशन योहानी आता बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. योहानी भूषण कुमार निर्मित आणि इंद्र कुमार दिग्दर्शित थँक गॉडद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे, ज्यात तिच्या ब्लॉकबस्टर गाण्याच्या हिंदी व्हर्जनचा समावेश करण्यात आला आहे.
या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा व रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचे हिंदी व्हर्जन तनिष्कने कम्पोझ केले असून, रश्मी विराग गाण्याचे बोल लिहित आहे. इंद्र कुमार यांनी सांगितले की, या ट्रॅकचे लवकरच शूटिंग करण्यात येणार आहे. संपूर्ण टीम हे गाणे प्रेक्षकांसमोर आणण्यास उत्साहित आहे. भूषण कुमार यांनी सांगितले की, भारतीय चाहत्यांसमोर हे पहिले हिंदी व्हर्जन असेल. योहानीने आपल्या बॉलीवूड डेब्यू बद्दल बोलताना सांगितले की, भारताकडूनही त्यांना खूप सारे प्रेम आणि सपोर्ट मिळाला आहे. भूषण जी आणि इंद्रकुमार जी या गाण्याचे हिंदी व्हर्जन थँक गॉडमध्ये वापरत आहेत, याचा खूप आनंद आहे. मी लवकरच भारतात येत आहे, असेही योहानीने स्पष्ट केले.