मेलबर्न – टी-२० विश्वचषकापूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मवरून अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले जात होते. आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही, याची चाहत्यांना चिंता होती, मात्र वॉर्नर या कठीण काळातून बाहेर पडला आणि आज संपूर्ण क्रिकेटचे जग त्याला सलाम करत आहे. उपांत्य आणि त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीराने आपल्या फलंदाजीचे दर्शन घडवत ऑस्ट्रेलियाला प्रथमच टी-२०क्रिकेटचा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वॉर्नरला त्याच्या दमदार कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. यानंतर त्याची पत्नी कँडिस वॉर्नरने टीकाकारांना आपल्या शब्दांमधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. कँडिस वॉर्नरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वॉर्नरला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडल्याचा फोटो शेअर केला आणि ‘खराब फॉर्म, खूप म्हातारा आणि हळू खेळणारा’ असे कॅप्शनमध्ये लिहिले. वॉर्नरच्या पत्नीने यासोबत हसणारा इमोजी शेअर केला आणि पतीला ट्रोल करणाऱ्यांना काहीही न बोलता जबरदस्त संदेश दिला. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी यूएई आणि ओमानच्या मैदानांवर खेळल्या गेलेल्या या विश्वचषकातील सात सामन्यांमध्ये ४८.१७ च्या सरासरीने आणि १४६.७० च्या स्ट्राइक रेटने २८९ धावा केल्या. संघाला सर्वात जास्त गरज असताना वॉर्नरने चोख कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय आवश्यक होता, त्यानंतर वॉर्नरने ८९ धावांची दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरची ४९ धावांची खेळी निर्णायक ठरली.