रत्नागिरी – महाविकास आघाडीत शित युद्ध पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले. शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे या आघाडीच्या मातब्बर नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच जुंपली आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. त्याला तटकरे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे जाधव संतापले आणि त्यांनी तटकरेंवर हल्लाबोल केला. कुणबी समाजाला जागा द्या म्हटलं, तर तुम्हाला मिरची का लागली?, असा सवाल करतानाच ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ’, असं म्हणत भास्कर जाधवांनी तटकरेंना टोला हाणला.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी, या भास्कर जाधवांच्या मागणीमुळे सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद उफाळला आहे. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्यानंतर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या?, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ?, केवळ नाव राष्ट्रवादी; पण काम मात्र कुटुंबवादी, अशी टीका जाधव यांनी केली. सुनील तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन करून लोकांच्या हजारो एकर जमिनी लाटल्याचे आरोप आहे. १० ते १५ हजार कोटींची बेहिशोबी माया गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहे. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा हल्लाच जाधव यांनी चढवला आहे. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण्यासाठी जाणीव आणि नीतीमत्ता लागते आणि सुनील तटकरे यांच्याकडे यातले काहीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, तटकरे यांना फक्त घ्यायचे माहिती आहे. द्यायचे माहीत नाही. तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. माझ्या कोणत्याही विजयात सुनील तटकरे यांचे योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी काड्या केल्या. मदत करणाऱ्यांचेच त्यांनी कायम वाटोळं केले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी जाधव यांनी दिवंगत आमदार माणिकराव जगताप आणि बॅरिस्टर अंतुले यांचे उदाहरण दिले. तटकरे स्वत:ला राष्ट्रवादीचा फाऊंडर मेंबर म्हणवतात; पण ते सत्य नाही. सुनील तटकरे हे मूळचे काँग्रेसचे आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.