मुंबई – राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत २०१९ मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला होता. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून, त्याबाबत राहुल गांधींना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे आले होते; मात्र राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात वेळेत उपस्थित राहू न शकल्यामुळे ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर ‘कमांडर इन थीफ’, ‘चौकीदार चोर हैं’, ‘चोरो का सरदार’ अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि त्यातील सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीमाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या वक्तव्यांचा या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशा प्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केले होते. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. २० सप्टेंबर, २०१८ रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, ‘गली गली मे शोर हैं, हिंदुस्तान का चौकीदार चोर हैं’ असा नारा दिला होता, तसेच २४ सप्टेंबरला एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधाने केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीबाबतीत अशी विधानं करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.