तिसरी लाट आली, जानेवारी अखेरीस रुग्णसंख्या उच्चांक गाठेल – आरोग्य मंत्री

क्वारंटाइनचा कालावधी सात दिवसांचा


मुंबई – राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून, कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही अजून वाढेल आणि ती जानेवारी अखेरीस उच्चांक गाठेल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून ८५ टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून, टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी लसीकरण जास्त झाले आहे, त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास ९० टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून, ६९ टक्के लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत, तसेच देशभरात क्वारंटाइनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल होणार नाही, असे केंद्राने सांगितल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाच राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. दुपारी साडेतीन ते साडेपाच अशी दोन तास विशेष बैठक घेतली गेली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत दोन तास संपूर्णत: पाच राज्यांचा आढावा झाला. त्यांनी काही माहिती दिली, या माध्यमातून राज्यांना काय-काय अडचणी आहेत आणि काय-काय केले पाहिजे?, याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. आजची परिस्थिती आम्ही त्यांना देखील सांगितली व जनतेला देखील सांगू इच्छित आहे की, ॲक्टिव्ह केसेस आजच्या १ लाख ७३ हजार एवढ्या आहेत. प्रामुख्याने बऱ्याच जणांना असे वाटत असते की, यापैकी आयसीयूमध्ये किती जण आहेत, तर आयसीयूमध्ये एकूण १७११ एवढे रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन किती लोकांना लागले?, तर ते ५ हजार ४०० लोकांना लागलेले आहे, तर हे एकूण पॉझिटिव्ह केसेसच्या किती टक्के आहे?, तर आयसीयूचे एकूण रुग्ण १ टक्का आहे आणि ऑक्सिजन लागणारे एकूण रुग्ण २ टक्के आहे. त्यामुळे दोन अधिक एक असे तीन टक्के, जर ऑक्सिजन आणि आयसीयूचे सोडले, तर १३ टक्के लोक हे जवळजवळ सौम्य आणि मध्यम स्थितीमधले निश्चितप्रकारे आहेत. त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचा विषय नाही की, खूप मोठ्या पद्धतीने मृत्यू होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर आयसीयू आणि ऑक्सिजन लागत आहे, अशी परिस्थिती नाही. हे सांगण्या मागचे माझे मुख्य कारण म्हणजे, आम्ही मंत्री महोदयांनादेखील हेच सांगितले की, आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्यामध्ये आयसीयू बेड्स किती आहेत, तर साधारण ३८ हजार ८५० आहेत. यापैकी १७१० बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आमची आयसीयू बेड्सची एकूण जी उपलब्धता आहे, त्यांच्या तुलनेत सध्या वापरात असलेले बेड्स जे आहेत, हे निश्चितपणे अत्यंत कमी आहेत. व्हेंटिलेटर्स बेड जे आहेत ते एकूण जवळपास १६ हजार आहेत, त्यापैकी ७०० बेड्सवर रुग्ण आहेत. ऑक्सिजन बेड्सदेखील १ लाख ३४ हजार आहेत. त्यापैकी ५ हजार ४०० रुग्ण ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या या सुविधांवर खूप ताण पडला आहे, असे नाही आणि ही बाब आम्ही मंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिलेली आहे. आरोग्य मंत्री म्हणतात की, याचबरोबर, या सगळ्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी होम आयसोलेशन किट्स तयार केले पाहिजेत. जे लोक होम आयसोलेटेड आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि घरी उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही २० मिली सॅनिटायझर, १० मास्क, माहिती पुस्तिका, १० पॅरिसिटीमॉल गोळ्या, २० मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, असे होम आयसोलेशन कीट हे प्रत्येक घरी असणाऱ्या व्यक्तीला देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …