ठळक बातम्या

तलवार चालवणारे तलवारीच्या घावानेच मरतात – संजय राऊत

नवी दिल्ली – ईडी, सीबीआयच्या कारवायांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे तलवार चालवतात ते तलवारीच्याच घावाने मरत असतात. तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल. तेव्हा हे शस्त्र तुमच्यावरच उलटलेले असेल, असा इशारा संजय राऊत यांनी शुक्रवारी दिला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. आम्ही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते आणि नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकर विभाग हे घरचे नोकर असल्यासारखे काम करीत आहेत. २०२४ नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतवरही टीका केली. सगळ्या फासावर गेलेल्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य काय भीक मागून मिळवले का? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी या संदर्भात मन की बात व्यक्त केली पाहिजे. गेल्या ७५ वर्षांत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री या सन्मानाने सन्मानित केले गेले आहे. तोच पुरस्कार कंगनाला दिला. हा समस्त स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. त्याकाळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट मिळाले आहेत. मग हे ताम्रपट काय भिकाऱ्यांना दिले? भाजपने यावर भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. तिला दिलेले सर्व पुरस्कार परत घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्यावरही टीका केली. सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुष वेशातील कंगनाबेन आहेत. काँग्रेसचे जुनेजाणते नेते राहुल गांधी आणि काँग्रेसला सतत अडचणीत आणत असतात. ते विद्वान आहेत. पुस्तक लिहितात. एखादी ओळ हिंदुत्वावर लिहून वाद आणि वादळे निर्माण करतात. हिंदुत्वाला किंवा हिंदुधर्माला बोकोहरम किंवा आयसिसची उपमा देणे हे कंगनाबेनने जो अपमान केला तसेच आहे. व्यक्तिगत मते असली तरी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …