तर भारतात दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात!

टास्क फोर्सचा इशारा
नवी दिल्ली – ब्रिटनसह यूरोपमधील अनेक देशांत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्याचवेळी भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सर्वात मोठी भीती व्यक्त केली आहे. यूरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे, त्या वेगाने भारतात रुग्णवाढ झाल्यास दररोज १४ लाख नवीन रुग्ण आढळू शकतात, असे सांगून पॉल यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्याचवेळी पॉल यांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड नियम काटेकोरपणे पाळावेच लागतील, असे पुन्हा एकदा बजावले आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आणि आता जगभरातील तब्बल ९१ देशांमध्ये ओमिक्रॉनने हातपाय पसरले आहेत. त्यात यूरोपीय देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. ब्रिटनमध्ये, तर रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ९३ हजार नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट शब्दांत धोक्याचा इशारा दिला आहे. यूरोपीय देशांमध्ये ८० टक्के नागरिकांनी कोविडवरील लसीचा किमान एक डोस घेतला आहे, तरीही काही देशांमधील स्थिती भीषण बनत चालली आहे. तेथील रुग्णसंख्येचा वेग पाहता याच वेगाने भारतात संसर्गाचा फैलाव झाल्यास दररोज १४ लाख नवीन बाधित आढळू शकतात, असे पॉल म्हणाले.
यूरोपमध्ये कोरोनाचा जो उद्रेक पाहायला मिळत आहे, त्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला हवे. मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊनही इतके रुग्ण आढळत असतील, तर तो मोठा धोका ठरतो, असेही पॉल यांनी नमूद केले. यूरोपमधील स्थितीवर बोट ठेवत पॉल यांनी भारतासाठी असलेल्या भविष्यातील संकटांबाबत सावध केले असून, अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतात ओमिक्रॉनचे शंभरांवर रुग्ण आढळले असले, तरी सध्याची स्थिती तितकीशी गंभीर नाही, मात्र काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत असून, त्याबाबत संबंधित राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना तिथे केल्या जाव्यात, असे पॉल यांनी सांगितले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही नागरिकांना सावध केले आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता सतर्क व्हावे लागेल. अनावश्यक प्रवास टाळावा लागेल, तसेच मोठ्या गर्दीचे समारंभ टाळून मोजक्या माणसांमध्ये हे समारंभ उरकावे लागतील. ती वेळ आता परत आली आहे. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असे ते म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …