- आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
- पुण्यातील एकमेव ओमिक्रॉनचा रुग्ण बरा
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी दिसल्यानंतर त्यांनी येथे आपल्या शैलीत त्या नागरिकांना सज्जड दम दिला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमिक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद देऊ लागलेत, पण जुन्नर, दौंड, पुरंदर व बारामती या चार तालुक्यांत डोसचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यास प्रशासनास सांगितले आहे. येत्या आठवड्यात आम्ही या चार तालुक्यांत दुसऱ्या डोससाठी प्रयत्न करणार आहोत, परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यांतील नागरिकांनी याला प्रतिसाद दिला नाही, तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले, तसेच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागणार का?, सोबतच कोविड लसींचा बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत महत्त्वाचे विधान केले. अजित पवार म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, तसेच बुस्टर डोसबाबत विचार सुरू आहे, पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, सरम इन्स्टट्यिूटकडे बुस्टर डोस उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पवार यांनी आरोग्य भरतीबाबत ही माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करू की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, असे ते म्हणाले. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे. त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहोत, असे ते म्हणाले.
पुण्यातील ओमिक्रॉनचा रुग्ण बरा, पिंपरी-चिंचवडमधील सहापैकी चार रुग्ण बरे
आनंदाची बातमी अशी की, पुण्यातील ओमिक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील सहा पैकी चार ओमिक्रॉनचे रुग्ण बरे झालेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे लक्ष्य पूर्ण झाले आहे, तसेच पिंपरी-चिंचवडमधील सहापैकी चार ओमिक्रॉन रुग्ण निगेटिव्ह झालेत. यात ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे, तर १२ आणि १८ वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत असल्याचेही अजित पवार म्हणाले.