…तर काँग्रेस ‘एकला चलो रे’साठीही तयार – खा. कुमार केतकरांचे वक्तव्य

नवी दिल्ली – २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने तिसरी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र ही तिसरी आघाडी काँग्रेससह असेल की, काँग्रेसला त्यात स्थान नसेल याबाबत अनेक मतमतांतरे येत आहेत. अशात काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. कुमार केतकर यांनी म्हटले आहे की, तिसरी आघाडी कोणाच्याही नेतृत्वात होऊ शकते. ममतांना तसे वाटत असेल, तर त्यांनी प्रयत्न जरूर करावा. काँग्रेस ‘एकला चलो रे’साठी सुद्धा तयार आहे, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्याशी एका मराठी वृत्तवाहिनीने खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
केतकर म्हणाले की, आम्ही तृणमूल काँग्रेसला सोबत बोलवणार आहोत; पण ते आले, नाही आले, तरी फरक पडत नाही. कधीकधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी)ही आलेला नाही, कधीकधी बीजेडी आलेले नाही, कधी सपा नाही. काँग्रेसने कधीच मागणी केली नाही की, नेतृत्व आम्हीच करणार आहोत. काँग्रेसला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे; पण काँग्रेसला डॅमेज होत आहे की नाही, हे पाच राज्यांच्या निकालानंतर कळेल, असेही केतकर म्हणाले.
केतकर यांनी म्हटले की, तृणमूलला फक्त एवढेच दाखवायचे आहे की ते स्थानिक, प्रादेशिक पक्ष नाहीत. असा प्रयत्न राष्ट्रवादीने पण करून पाहिला होता. काही लोक त्यांना महाराष्ट्रापुरते आणि काही, तर पश्चिम महाराष्ट्रापुरते म्हणत होते मग त्यांनी गुजरात आणि इतर ठिकाणी अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रादेशिक पक्षांना आपले अस्तित्व दाखवण्याचा अधिकार आहे. पण त्यामुळे काँग्रेस डॅमेज होईल की नाही हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. उद्या परिस्थिती बदलली आणि त्यांना लक्षात आले की, काँग्रेस खूप क्षीण झाली आहे तर ते काँग्रेसशिवाय दुसरी आघाडी करतीलही. हे सगळे पक्ष अँटीकाँग्रेस वातावरणात वाढलेले आहेत. या पक्षांना केंद्रातल्या सत्तेला धरून रहावे असे वाटत असते, त्यामुळे यातले अनेक जण तृणमूल, डीएमके याआधी भाजपसोबत सुद्धा सत्तेत राहिलेले आहेत, असेही ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …