ठळक बातम्या

तपासाची दिशा बदलली

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी जो काही गदारोळ माजवला आहे, त्यामुळे गेले तीन आठवडे संपूर्ण वातावरण गढूळ झालेले आहे. राजकारण्यांवरचा, पोलीस यंत्रणेवरचा, तपास यंत्रणांवरचा विश्वास उडवण्याचे काम नवाब मलिक यातून करत आहेत; पण यातून प्रश्न एकच निर्माण होतो की, जर नवाब मलिक यांचा जावई पकडला गेला नसता, तर नवाब मलिक यांनी अन्य कोणासाठी एवढा आकांडतांडव केला असता का?, इतकी आदळ आपट केली असती का?, नवाब मलिक यांनी तपासाला वेगळी दिशा देत, समीर वानखेडे यांच्या खासगी आयुष्यात हात घालून त्यांची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे; पण जर त्यांनी खरोखरच बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली होती, तर नवाब मलिक इतके दिवस का गप्प बसले होते? जावई पकडला गेला नसता, तर त्यांनी ही रहस्ये बाहेर काढली असती का?, हे गौप्यस्फोट तेव्हा त्यांनी केले असते का?, समीर वानखेडे यांच्या धर्म, जात, बनावट प्रमाणपत्रे यांची नवाब मलिक यांना माहिती होती, तर एक राजकारणी नेते असताना, मंत्री असतानाही इतके दिवस ते गप्प का बसले होते? या प्रश्नांची त्यांना उत्तरे द्यावी लागतील.

केवळ आरोपांची राळ उठवण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने नवाब मलिक यांच्या माध्यमातून सुरू केला आहे; पण सर्वसामान्य जनतेला एकच प्रश्न आहे की, इतके जर पुरावे तुमच्याकडे आहेत, तर नवाब मलिक ते घेऊन कोर्टात का जात नाहीत? हे सगळं प्रसारमाध्यमांपुढेच का सांगत आहेत? यामुळे सध्या नवाब मलिकांना हिरो म्हणून भरभक्कम प्रसिद्धी मिळत आहे. त्यांच्यात आणि किरीट सोमय्या यांच्यात जणू काही स्पर्धा लागली आहे, असे चित्र आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात ब‍ºयापैकी मौन बाळगणे पसंत केले आहे. त्याचा अर्थ जनतेला निश्चितच समजत आहे हे नक्की; पण यातून एक स्पष्ट होत आहे की, समीर वानखेडे चुकीचे वागत असले, त्यांनी गैर काम केले असले, तरी ते बाहेर काढण्याचे काम फक्त जावई पकडल्यावरच नवाब मलिक करणार आहेत. अन्यथा माहिती असतानाही त्यांनी समीर वानखेडे यांना पाठिशी घातले असते किंवा दुर्लक्ष केले असते.
या प्रकरणाला गेल्या चार दिवसांत धर्म, जात असे स्वरूप देऊन अत्यंत हिनपणा आणला गेला आहे. एका आयपीएस अधिकाºयाच्या खासगी आयुष्यात इतके डोकावणे, घरातील महिलांची बदनामी करणे हे अत्यंत गलिच्छ प्रकार आहेत. सभ्यतेचे सगळे नियम धाब्यावर बसवून मलिक यांच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. नवाब मलिक व्यतिरिक्त बाकी कुणीच फारसे बोलत नाही. नवाब मलिक बोलतात, त्याचे एक विशिष्ट कारण आहे. नवाब मलिकांचा जावई समीर खान गेल्या जानेवारी महिन्यात अशाच एका ड्रग्जच्या प्रकरणात सापडला होता. आठ महिने तुरुंगात राहिल्यावर गेल्या सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मिळाला. जावईबापू समीर यांच्यावरील ही कारवाई एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेच केली होती. योगायोगाने त्याच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरूख खान यांचे चिरंजीव आर्यन खान याला क्रूझवरील धाडीदरम्यान ड्रग्जच्या प्रकरणात पकडले. मुद्दा एवढा स्पष्ट आहे की, जावईबापूंवरील कारवाईमुळे नवाब मलिक बिथरले आहेत आणि ते आतापर्यंत संधी मिळण्याची वाट पाहत होते. त्यामुळे त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपांची सरबत्ती सुरू केली आहे. आर्यन खान हे निमित्त त्यांना आयतेच सापडले आहे. समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला प्रस्तुत करून त्यांनी फसवणुकीच्या माध्यमातून आयआरएस सेवेत प्रवेश केला. त्यांचे पूर्वीचे लग्न एका मुस्लीम महिलेशी झाले होते. ते खंडणी मागतात, लाचखोरी करतात इत्यादी प्रकारचे आरोप मलिक करीत आहेत. हे सगळे आरोप करण्याचा त्यांचा अधिकार मान्य केला, तरी आर्यन खानच्या प्रकरणाशी किंवा एनसीबी करीत असलेल्या कारवाईशी त्यांचा काहीही संबंध नाही. वानखेडेंची जात काढणे, त्यांच्या धर्माचा मुद्दा उपस्थित करणे याचे काहीही औचित्य नाही. हे काढल्याने जावईबापूंचे निर्दोषत्व सिद्ध होणार आहे का? याचा अर्थ स्पष्ट आहे, की तपासाची दिशा भरकटवून तपासात अडथळे निर्माण करणे. एनसीबीने आता समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केलेली आहे. त्यांच्यावर कदाचित कारवाई होईलही. त्यांची बदली होईल. निलंबित केले जाईल. काहीही होईल; पण हा तपास करण्यासाठी दुसरा कोणी तरी येणारच आहे. त्याच्या तपासाचे काय? समीर वानखेडे यांना बरबाद केले आहे, असे भासवून नवा कोणी तपास करणार नाही, असे वातावरण निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत काय, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. जर जावई निर्दोष आहे, तर घाबरायचे कारणच नाही, इतकी साधी बाब आहे. हे सगळे नवाब मलिकांना कळत नाही, असे नाही; पण केवळ तपास थांबवणे आणि त्याची दिशा बदलण्याचे हे राजकारण आहे, असेच दिसत आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …