नागपूर – मुंबईतील क्रूझ पार्टीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या सत्तेच्या सावटाखाली देशात ड्रग्जचा व्यापार होत आहे, असे ते म्हणाले.
ड्रग्ज सापडलेली इनोव्हा एमएच-१२-३००० ही गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली. त्यांचा पत्ता कराडचा आहे. याच गाडीत २१ सप्टेंबरला तीन हजार किलोंचा ड्रग्ज पकडला गेला. त्यानंतर ते २२ सप्टेंबरला गुजरातमध्ये पोहचतात. ते गुजरातचे मंत्री राणा यांना भेटतात. त्यानंतर २ ऑक्टोबरला काम हो गया, असा व्हिडीओ व्हायरल होतो. त्यापूर्वीसुद्धा याच गाडीतून ड्रग्ज गेल्याची माहिती आहे. सुनील पाटील हे समीर वानखेडेंशी संबंधित आहेत. या सर्वांचा मास्टर माइंड समीर वानखेडे आहे. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली. गाडीमालक रवींद्र कदम यांना अटक केली, तर वास्तव बाहेर येईल. कराड येथील दिलेल्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात आलेले ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदू-मुसलमान वादाचा घाट घातला जात आहे. गौतम अदानीच्या पोर्टवर ड्रग्जची झालेली कारवाई जगातली सर्वात मोठी कारवाई आहे, पण यापासून लक्ष भटकावे म्हणून मुंबई ड्रग्ज प्रकरण काढण्यात आल्याचे अतुल लोंढे म्हणाले. मध्यप्रदेशातील नीरज यादव हा भाजपचा कार्यकर्ता आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माइंड एनसीबीचे समीर वानखेडे आहेत. त्यांना अटक करावी. ५० लाखांची देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आहे. नशेचा विळखा घातला जात आहे. याची महाराष्ट्र सरकारने चौकशी करावी. ही देशाच्या लोकशाहीची बाब आहे. युवकांचे भविष्य बिघडविण्याचे काम भाजप करत आहे. गाडीचा मालक रवींद्र कदम, सुनील पाटील, समीर वानखेडे, किरण गोसावी, भानुशाली हे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत. त्यांचे फोटोग्राफ समोर आले. देशभक्तीच्या गोष्टी करणारे लोक या ड्रग्ज रॅकेटमध्ये दिसत आहेत. यांचे फोटो भाजपच्या नेत्यांसोबत आहेत, यामधून भाजपचे संबंध ड्रग्जशी जुळत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला.
One comment
Pingback: this article