औरंगाबाद – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने देण्यात येणारे प्राचार्य राम शेवाळकर वाङ्मय पुरस्कार यंदा संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण आणि वाङ्मयाच्या क्षेत्रात आयुष्यभर संस्थात्मक लक्षणीय कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर म्हसाळकर यांना देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नियुक्त केलेल्या निवड समितीने घेतला आहे. या दोन्ही पुरस्कारांची घोषणा गुरुवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी औरंगाबाद येथे केली. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ / पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच त्यांना हे पुरस्कार त्यांच्या सोयीने प्रदान करण्यात येतील.
प्राचार्य राम शेवाळकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नावाने दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार प्रायोजित केलेला असून, तो क्रमाक्रमाने श्रेष्ठ लेखक कवीला, भाषाभ्यासकाला, अभ्यासू वक्त्याला, संत वाङ्मयाच्या अभ्यासक संशोधकाला आणि वाङ्मयाच्या क्षेत्रात दीर्घकाळ लक्षणीय कार्य करणाऱ्या साहित्य संस्थात्मक ज्येष्ठ कार्यकर्त्याला देण्यात यावा, अशी शेवाळकर कुटुंबीयांची व मराठी साहित्य महामंडळाची भूमिका आहे. कोरोनामुळे राहून गेलेला सन २०२०-२१ चा पुरस्कार संत साहित्याच्या अभ्यासकाला संशोधकाला द्यावयाचा होता. त्यासाठी पुरस्कार निवड समितीने डॉ. यु. म. पठाण यांची तर सन २०२१-२२ च्या साहित्य संस्थात्मक वाङ्मयीन कार्यकर्ता या पुरस्कारासाठी नागपूरचे मनोहर म्हैसाळकर यांची निवड केली आहे.
मराठी संत परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक म्हणून डॉ. यू. म. पठाण हे सवर्दूर ओळखले जातात. संत साहित्यावर त्यांचे जवळपास 20 ग्रंथ प्रकाशित असून एकूण ग्रंथसंपदा 40 च्या आसपास आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता चौथ्या राम शेवाळकर पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही त्यांचा गौरव केला आहे.
पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरलेले मनोहर म्हैसाळकर हे गेल्या दहा वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असून काही काळ ते अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचेही अध्यक्ष होते. 1982 पासून त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा अविरतपणे सांभाळली. आज विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे समीकरणच बनले आहे. त्यामुळेच यंदाच्या पातव्या प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची एकमताने निवड केली आहे.