डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार

जगातील असा एकमेव विद्यार्थी की, ज्यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा महान विद्यार्थीची आज जयंती आहे, अर्थात १४ एप्रिल, १८९१ रोजी जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. देश-विदेशात आनंदाने साजरी केली जाते. ज्या महामानवामुळे आज आपल्या देशाचा संपूर्ण कारभार चालत आहे. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला. दीन दुबळ्या समाजाला स्वत:चे हक्क मिळवून देण्यासाठी ते झटले. स्वत:चे जीवन समाजासाठी समर्पित करून अस्पृश्यांना समस्याच्या दरीतून बाहेर काढणाºया महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.

११ सप्टेंबर, १९३८ रोजी पुणे येथे अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यावेळी बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा! असा विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य प्राप्त करणारा व आत्मविश्वास वाढविणारा संदेश त्यांनी दिला. याचे परीक्षण आजच्या विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. शेवटी आपल्या भाषणात ते म्हणतात, जर आपण एकजुटीने वागाल, तर काही तरी करू शकाल. आपल्या समाजावर हजारो वर्षांपासून होत असलेला जोरजुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे. आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरूरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू, अशी माझी खात्री आहे. यासाठी शिस्त अत्यंत कठोरपणे पाळली पाहिजे. संघटना, शील व शिस्त वाढवून समाज उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत आहे की, विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेता कामा नये. अभ्यास सोडून ते जर राजकारणात पडले, तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते.
प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि नैतिक चारित्र्य ही मूल्ये रुजवणे हा त्यांच्या शिक्षणाच्या तत्वज्ञानाचा मूळ विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंचा अभ्यास केल्यास त्यांचे विचार आपल्या सर्वांनाच आयुष्यात प्रेरणादायी आहेत. बाबासाहेबांनी प्रत्येकाला त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यासाठी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा! असा संदेश दिला. जे या संदेशाप्रमाणे गेले ते आज उच्च पदावर काम करताना दिसत आहेत. जे प्रामाणिकपणे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. बाबासाहेबांनी आपल्याला वाघासारखे बना असे सांगितले आहे. जर आपण वाघासारखे राहिलो, तर आपल्या वाट्याला कोणीही जाणार नाही, तेव्हा कोणताही अत्याचार करणाºयापेक्षा अत्याचार सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो, तेव्हा संघटीत होऊन लढा द्यावा लागेल. मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती वा स्वास्थ्यापेक्षा अधिक असते असे बाबासाहेबांना वाटते. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले, तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. या बाबासाहेबांच्या विचाराचे आत्मपरीक्षण करायला हवे. यातच बराच इतिहास सांगून जातो. त्यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करून आपल्या जीवनात प्रामाणिकपणे काम करायला हवे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म आवडतो. जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात. कोणत्याही समाजात महिलांनी केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात समाजाची प्रगती मोजता येईल. देशात एखादा महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो की, तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो. यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा. प्रामाणिकपणा ही सर्व नैतिक गुणांची बेरीज असते, असा ठाम विश्वास बाबासाहेबांना होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी शिक्षणाला प्राधान्य देऊन त्याचा उपयोग चारित्र्य संपन्न व्यक्तींच्या वाढीसाठी केला आहे. केवळ नागरिकांमध्ये जागरूकता आणि मानवी हक्कांची पूर्तता करत नाही, तर भारतात मानवी सन्मान आणि न्याय देणारे शिक्षण बाबासाहेबांना हवे होते. यामुळे अन्याय व शोषण दूर करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. अशिक्षितपणा हा गरीब लोकांच्या मागासलेपणाचे प्रमुख कारण आहे. त्यासाठी त्यांनी मानवतावादी शिक्षणाला प्राधान्य दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ज्ञान दोन हेतूने घेतले जाते. ज्ञानाचा स्वत:च्या भल्यासाठी वापर करणे, तसेच दुसºयाच्या भल्यासाठी ज्ञान घेणे. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक आणि नैतिक तत्वज्ञानाचा उद्देश नैराश्यग्रस्त लोकांना त्यांचे विचार आणि जुने वर्तन-पद्धती बदलण्यासाठी जागरूक करणे आणि शिक्षणाद्वारे एकता आणि स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे जाणे हा आहे. समाजाच्या आणि राष्ट्राच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील संस्कृती, चालीरीती, कर्तव्ये, अर्थव्यवस्था, ऐतिहासिक दृष्टीकोन, विविध समाजाविषयीचे ज्ञान आणि तार्किक विचार यांचा विचार करून अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य तयार केले पाहिजे. समाजात समानता आणण्यासाठी शिक्षण हे परिवर्तनाचे साधन म्हणून काम करू शकते, असा त्यांचा विश्वास होता.
– रवींद्र तांबे, मुंबई विद्यापीठ.\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …