
प्रथम फलंदाजी करताना डेक्कन ग्लॅडिएटर्सने निर्धारित १० षटकांत बिनबाद १५९ धावा केल्या. रसेल आणि कॅडमोर यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली बुल्स संघाने चांगली सुरुवात केली होती, पण २४ धावांवर ओडियन स्मिथने दिल्लीला सलग दोन धक्के दिले. यानंतर २९ चेंडूंत ४२ धावा करणाऱ्या चंद्रपॉल हेमराजने एका बाजूने डाव सावरला होता, पण दुसऱ्या बाजूकडून त्याला साथ मिळाली नाही आणि दिल्ली बुल्स संघ विजेतेपदापासून ५६ धावा दूर राहिला. निर्धारित १० षटकांत सनी लिओनच्या दिल्ली संघाला ७ गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावांच करता आल्या.
तिसऱ्या क्रमांकाचा सामना बरोबरीत सुटला.
गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या अबुधाबी संघाला तिसरे स्थान मिळाले, पण घरच्या मैदानावर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला बांगला टायगर्ससोबतचा सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना अबुधाबी संघाने कॉलिन इंग्रामच्या ४१ धावांच्या जोरावर ५ बाद ९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ६ बाद ९८ धावांच करू शकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.