ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ३६ तासांचा मेगाब्लॉक


शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार मेगाब्लॉक
ठाणे – ठाणे आणि दिवादरम्यान सुरू असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा चौथा मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता सुरू होणारा हा मेगाब्लॉक सोमवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहाणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान नेहमीप्रमाणे यावेळी देखील ठाणे आणि कल्याणदरम्यान धिम्या मार्गावरील स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. अप आणि डाऊन मार्गांवरील सर्व लोकल गाड्या या ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर न धावता जलद मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे ते दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामासाठी याआधी मध्य रेल्वेकडून अनेक मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. या मार्गिकेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी येत्या शनिवार, रविवार आणि सोमवारी म्हणजेच ८, ९ आणि १० जानेवारी रोजी तीन दिवसांचा चौथा मोठा ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बो मेगाब्लॉक ८ जानेवारीला शनिवारी दुपारी २ वाजता सुरू होणार असून, १० तारखेला सोमवारी पहाटे २ वाजेपर्यंत असा ३६ तास सुरू राहणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकदरम्यान मुंबई ते कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावरून न धावता जलद मार्गावर धावणार आहेत, तसेच यादरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या धिम्या स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कसारासाठी निघणाऱ्या डाऊन मार्गावरील धिम्या/अर्ध जलद लोकल मुलुंड स्थानकावरून मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. अप मार्गावर देखील अशाच प्रकारे धिम्या/अर्ध जलद सर्व लोकल गाड्या कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सेवा उपलब्ध नसतील. तसेच कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत धिम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील. या जम्बो मेगाब्लॉकदरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली येथील प्रवाशांसाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून विशेष परिवहन सेवेच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेकडून महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळपासून अप आणि डाऊन मार्गावरील धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …