मुंबई – संयुक्त अरब अमीरातमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेले, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीवर अनेकांनी टीकाही केली. पण भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात मौन बाळगले होते. हे मौन त्यांनी सोडले आहे. मागील ५ वर्षांमध्ये भारतीय संघाची ही सर्वात सुमार कामगिरी असल्याचे परखड मत गांगुली यांनी मांडले आहे. प्रसारमाध्यमांसमोर गांगुली म्हणाले की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास २०१७ पर्यंत भारतीय संघाची कामगिरी ठीक होती. २०१७ मध्ये पाकिस्तान संघाने ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाला पराभूत केले त्यावेळी मी कॉमेंट्री पॅनलमध्ये होतो. त्यानंतर २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाने चांगली कामगिरी केली, पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही टीम इंडियाने निराश केले. मागील ४-५ वर्षांतील संघाची ही निराशजनक कामगिरी आहे, असा उल्लेख गांगुली यांनी केला आहे.
संघाची कामगिरी ढासळण्यामागे नेमक कारण काय? याच उत्तर अजूनही मिळालेले नाही. पण टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत खेळाडू अडखळत खेळताना दिसले. काही वेळा मोठ्या स्पर्धेत या गोष्टीचा सामना करावा लागत असतो. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने १५ टक्के क्षमतेनेच खेळताना दिसला. त्याचा संघाला फटका बसला, असेही गांगुलींनी म्हटले आहे.