दुबई – भारतीय कर्णधार विराट कोहली येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर ही बुधवारी नव्याने जारी आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत एक क्रमांक मागे पाचव्या स्थानी सरकला. तर त्याचा सहकारी के. एल. राहुलला दोन क्रमांकाचा तोटा सहन करावा लागला असून तो आता आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
भारताला पाकिस्तानविरुद्ध रविवारी सुपर-१२ च्या सामन्यात १० विकेटने पराभवाचा सामना करावा लागला, पण विराट (७२५ रेटिंग गुण)ने यात ४९ चेंडूंत ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर राहुल (६८४) ने तीन धावा केल्या. पाकिस्तानचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवान तीन क्रमांक पुढे चौथ्या स्थानी पोहचला. रिझवानची करिअरमधील सर्वोत्कृष्ट क्रमवारी आहे. भारतविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७९ धावा व न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी संघाच्या दुसऱ्या विजयात ३३ धावांचे योगदान दिल्यामुळे रिझवानला त्याचा फायदा मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन माक्ररामने ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजविरुद्ध अनुक्रमे ४० व नाबाद ५१ धावांची खेळी केली, ज्यामुळे त्यानेही करिअरमधील सर्वोत्कृष्ट क्रमवारी प्राप्त केली आहे. त्याने आठ क्रमांकाची गरुड भरारी घेत थेट तिसरे स्थान गाठले. आता त्याचा इंग्लंडचा डेव्हिड मलान (८३१) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (८२०) यांच्यानंतर क्रमांक येतो. माक्ररामची मागील सर्वोत्कृष्ट क्रमवारी नऊ होती. अफगाणिस्तानचा रहमनुल्लाह गुरबाज नऊ क्रमांक पुढे करिअरमधील सर्वोत्कृष्ट १२ व्या स्थानी पोहचला. त्याने स्कॉटलंडविरुद्ध ४६ धावा केल्या, तर बांगलादेशचा सलामी फलंदाज मोहम्मद नईम श्रीलंकाविरुद्ध ५२ चेंडूंत ६२ धावा करत ११ क्रमांक पुढे १३ व्या स्थानी पोहचला आहे. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस आपल्या संघाला सुपर-१२ पर्यंत पोहचवण्यानंतर संयुक्त ३७ व्या स्थानी पोहचला. गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल नऊ मध्ये फिरकीपटूंचा समावेश आहे. बांगलादेशचा फिरकीपटू महेदी हसन सलगच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर नवव्या स्थानी पोहचला आहे. भारतविरुद्धच्या विजयात चमकदार कामगिरी करणारा वेगवाग गोलंदाज शाहीन आफ्रिदी आपल्या ३१ धावांतील ३ विकेटच्या कामगिरीने ११ क्रमांक पुढे १२ व्या स्थानी पोहचला. तो आपल्या करिअरच्या सर्वोत्कृष्ट क्रमवारीसाठी फक्त दोन स्थान पिछाडीवर आहे. हारिस रौफने न्यूझीलंडविरुद्ध २२ धावा देत ४ विकेट मिळवत पाकिस्तानला सलग दुसरा विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे तो ३४ क्रमांक पुढे १७ व्या स्थानी पोहचला. बांगलादेशचा स्टार फलंदाज शाकिब अल हसनने अष्टपैलूंच्या यादीत आपले अव्वल स्थान मात्र कायम राखले आहे.