टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल

मुंबई – कर्णधार विराट कोहलीच्या बुधवारच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर गुरुवारी सकाळी भारतीय संघ मुंबईहून विशेष विमानाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला. सायंकाळी उशिरा टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दाखल झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने विमानात बसलेल्या व नंतर जोहान्सबर्गमध्ये उतरलेल्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. कॅमेऱ्यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हास्य होते, तर चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत. कसोटी मालिका संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली मात्र या फोटोंतून गायब आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नव्याने निवड झालेल्या रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला प्रकर्षाने जाणवेल. मुंबईत सरावादरम्यान झालेल्या दुखातपतीमुळे रोहित शर्मा या कसोटी मालिकेत खेळणार नाही. रोहितसह रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे दोन प्रमुख डावखुरे गोलंदाजही या मालिकेत खेळणार नाहीत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आजवर एकूण ३९ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १५ तर टीम इंडियाने १४ कसोटी सामने जिंकले आहेत. उर्वरित १० सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले आहेत. टीम इंडियाने आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलू शकतो, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला आहे. कोहलीसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा अनेक अर्थांनी मोठा आहे. आतापर्यंत कुठलाही भारतीय कर्णधार दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय मिळवू शकलेला नाही. कोहलीला ही पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी चालून आली आहे. चांगली कामगिरी करून दाखवण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. कोहलीच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
संघात यांना स्थान
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाळ.
राखीव खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजान नागवासवाला
नो फोटोज प्लीज …
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट बरोबर त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाही आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होत असताना विराट कोहली फोटोग्राफर्सना फोटो काढू नका, असे सांगत होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानतळावर अन्य सदस्यांसह विराट आणि अनुष्का बसमध्ये जाऊन बसले. त्यानंतर विराट बसमधून उतरला व त्याने फोटोग्राफर्सना बेबीचे फोटो काढू नका, असे सांगितले. बेबी म्हणजे विराटची एक वर्षाची मुलगी वामिका. विराटने मुंबई विमानतळावर मुलगी वामिकाचे फोटो न काढण्याचे मीडियाला आवाहन केले. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …