दिल्लीतून दोघांना अटक, तर तुकाराम सुपेंच्या ड्रायव्हरलाही अटक
पुणे – टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून, या घोटाळ्याचे दिल्ली कनेक्शनही समोर आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा याला अटक केली आहे. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकाºयाने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच तुकाराम सुपेंच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे. टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ३१ आरोपींना अटक केली आहे.
टीईटी पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांचा ड्रायव्हर सुनील खंडू घोलप यालाही अटक केली आहे. सुनील घोलप याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली.
या परीक्षा घोटाळा प्रकरणात एजंट मनोज डोंगरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मनोज डोंगरे याला लातूर येथून चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर टीमने दिल्ली येथून आशुतोष शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोघांचीही चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ३० डिसेंबर रोजी अटक केली.
आरोग्य भरतीनंतर म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघाले आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. छापेमारीत आरोपी सुपे यांच्या घरात पोलिसांना दोन कोटींहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतींचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसºया ठिकाणी लपवली होती.
पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरातून तब्बल २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि काही हिरे जप्त केले आहेत. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जीए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली होती.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …