मुंबई – राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’च्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. आता ३० ऑक्टोबर रोजी होणारी टीईटी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती; मात्र त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१च्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे.
याआधी टीईटी १० ऑक्टोबर रोजी नियोजित होती; मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी)ची परीक्षा आल्याने टीईटी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले. ३१ ऑक्टोबरच्या दिवशी या आधीच पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने ३१ ऑक्टोबर ऐवजी टीईटी ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे ही तारीख पुन्हा बदलून ती २१ नोव्हेंबर करण्यात आली आहे, त्यामुळे सतत परीक्षेची तारीख बदलत असल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. साधारणपणे टीईटी परीक्षेला राज्यातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवार बसणार आहेत, यासाठी ५ हजार परीक्षा केंद्रांचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.