झारखंडमध्ये भीषण अपघात

  • प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला ट्रकची धडक
  • १५ जण ठार

रांची – झारखंडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका बसला सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यात तब्बल १५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या अपघाताची तीव्रता एवढी प्रचंड होती की, ट्रकसह बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर बसची पुढील दोन्ही चाकेही अपघातात निखळली होती. दरम्यान, या अपघातामुळे बराच वेळ वाहतूकही खोळंबलेली.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या अमरापाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कोला गावात ही भीषण दुर्घटना घडली. यात प्रवाशांनी भरलेल्या बस आणि गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार टक्कर झाली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट बसला समोरून ठोकर दिली. ज्यानंतर खूप मोठा आवाज झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड मोठे नुकसान झाले, तर बसमधील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनाही अपघाताबाबत कळवण्यात आले. आतापर्यंत ट्रक आणि बसच्या या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मृताचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, ज्या प्रवासी बसचा अपघात झाला, ती साहिबगंजहून दुमका येथे जात होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …