- पेट्रोल दरात थेट २५ रुपयांची कपात
रांची – इंधन दरवाढीने कंबर तुटलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने करात कपात करत पेट्रोल, डिझेलचे दर काही प्रमाणात कमी करत, त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी आपल्या करातही कपात करत इंधन दर आणखी कमी केले. या राज्यांमध्ये आता झारखंडचाही समावेश झालेला आहे. झारखंडमधील हेमंत सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पेट्रोलचे दर तब्बल २५ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झारखंडच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री सोरेन म्हणाले की, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे सरकारने राज्य स्तरावर पेट्रोलचे दर २५ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सरकार विद्यार्थ्यांना स्टुडेंट क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येणार नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना बँक लोन देत नाही, या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढणार आहे. सध्या रांचीमध्ये पेट्रोल ९८.५२ रुपये लीटर आहे, तर डिझलचे दर ९१.५६ रुपये लीटर आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधीच म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणारे एक्साइज कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसशासित, बिगरभाजप शासित राज्यांनी दर कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मात्र तरीही पेट्रोल-डिझेलचे दर राज्यात बऱ्याच ठिकाणी १०० च्या वरच आहेत. केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनी व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाजपशासित राज्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय पंजाब, राज्यस्थान आणि छत्तीसगढ या भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांनीही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विरोधीपक्ष भाजपने यावरून महाविकास आघाडी सरकारवर अनेकदा टीकास्त्र सोडले आहे.