भारतातील मुख्य ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या झी ५ ने अलीकडेच आपली नवीन वेब सीरिज कौन बनेगा शिखरवतीचा ट्रेलर रिलीज केला आहे. यामध्ये नसिरुद्दीन शाह, रघुबीर यादव, सोहा अली खान, लारा दत्ता, अन्या सिंग, कृतिका कामरा, साइस साहुकार तसेच वरुण ठाकूर हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत.
त्या निमित्ताने दिग्गज अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या ४५ वर्षांच्या अभिनय करिअरवर बोलताना सांगितले की, ‘मी माझ्या अभिनय प्रवासात जवळपास त्या सर्व भूमिका साकारल्या आहेत, ज्या मला करायच्या होत्या. मी एक अभिनेता म्हणून ते सर्व काम केले आहे जे मला वास्तवात करण्याची इच्छा होती. त्याकरिता मी खूप आभारी आहे. आता मला केवळ त्या प्रोजेक्ट्सचा हिस्सा बनायचे आहे, जे मजेदार असतील. ज्याची कथा सामान्य कथेपेक्षा अधिक असेल.
हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या करिअरमध्ये निशांत, जाने भी दो यारो, मंडी, स्पर्श, बाजार, वो सात दिन, सरफरोश, ए वेनस्डे, मकबूल, इश्किया असे एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट केले. नसिरुद्दीन शाह हे आपल्या करिअरच्या सुरुवातीला १९८०च्या दशकाच्या अखेरीस डीडी कार्यक्रम भारत : एक खोज आणि मिर्झा गालिब यांसारख्या कार्यक्रमांद्वारे छोट्या पडद्यावर दिसून आले होते. २००६ मध्ये नसीरजींनी यू होता तो क्या होता द्वारे आपल्या चित्रपट दिग्दर्शनालाही सुरुवात केली. इतकेच नव्हे तर त्यांनी लॅव्हेंडर कुमार, इस्मत चुगताई आणि सआदत हसन मंटोद्वारे लिखित नाटकांचे दिग्दर्शनही केले होते.