जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचे पारडे जड; विराट सेनेकडे इतिहास घडवण्याची संधी

जोहान्सबर्ग – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सोमवारपासून जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती ‘करो या मरो’ अशी असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला, तर त्यांना मालिकादेखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
आकडेवारीनुसार, जोहान्सबर्गमध्ये भारताचा हा सहावा कसोटी सामना असेल. भारताने याआधी येथे खेळलेले ५ पैकी २ कसोटी सामने जिंकले आहेत, तर ३ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. जोहान्सबर्गचे आकडे टीम इंडियाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट आहे. फलंदाजांचा विचार केल्यास भारतीय संघात नवा चेहरा दिसणे शक्य नाही. एखादा खेळाडू जायबंदी झाल्यास ऐनवळी फलंदाजांच्या क्रमवारीत बदल दिसू शकतो. त्यामुळे पाच मुख्य फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला खेळवण्याचे धोरण कायम राहील. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मधल्या फळीतील चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या दुकलीवर विश्वास ठेवून आहे. त्यामुळे या दोघांना वगळण्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांना ताटकळत उभे रहावे लागण्याची शक्यता आहे. कर्णधार कोहली, पुजारा व रहाणे ही त्रिमूर्ती गेल्या वर्षभरापासून शतक झळकावण्यापासून वंचित आहे. एकाच वेळी या तिघांना सूर गवसल्यास यजमान संघाला महागात पडेल. आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर पाच गोलंदाजांचे सूत्र पहिल्या कसोटीत यशस्वी ठरले होते. त्यामुळे मालिकेत आघाडीवर असलेला भारतीय संघ जोहान्सबर्गमध्ये अंतिम अकरात बदल करणार नाही. अष्टपैलू म्हणून निवडण्यात आलेला शार्दुल ठाकूर फलंदाजीत चमक दाखवू शकला नव्हता. या परिस्थितीत त्याला पर्याय म्हणून उमेश यादवचे नाव पुढे येत आहे, मात्र यादवकडे अष्टपैलुत्वाचा गुण नाही आणि तो शार्दुलच्या पथ्यावर पडला आहे. फिरकीत आर. अश्विन चेंडू हाताळताना दिसेल, तर द.आफ्रिकेचाकर्णधार डीन एल्गार आणि तेंबा बवुमा यांच्यावर आफ्रिकेची फलंदाजीची भिस्त आहे. ॲडन मार्कराम, कीगन पीटरसन आणि रेसी वॉन डेर डुसे यांच्यात संयमाचा गुण दिसत नाही. गोलंदाजीत कगिसो रबाडा व लुंगी एनगिडी या दुकलीला नजर अंदाज करून चालणार नाही. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात आपल्या माऱ्याची त्यांनी चुणूक दाखवून दिली होती.

जोहान्सबर्ग कसोटीवर पावसाचे सावट
पहिल्या कसोटीप्रमाणे जोहान्सबर्ग कसोटीवरही पावसाचे सावट असणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी जोहान्सबर्गमध्ये पाऊस झाला होता. सोमवारी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीसुद्धा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दुपारी लंचनंतरचे सत्र पावसामुळे वाया जाऊ शकते. तर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, मंगळवारीसुद्धा पावसाचा अंदाज आहे. सेंच्युरियन कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने खराब केला होता. तसाच जोहान्सबर्ग कसोटीचाही संपूर्ण दुसरा दिवस पावसामुळे वाया जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …