आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम प्रेक्षकांची मने जिंकून घेत आलेली शेफाली शाह सध्या आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने एका वयानंतर अभिनेत्रींच्या वाट्याला येणाऱ्या व्यक्तिरेखांविषयी मोकळेपणाने आपले मत मांडले आहे. त्याचबरोबर तिने २००५ मध्ये आलेल्या वक्त चित्रपटाच्या वेळी तिने अक्षयच्या आईची भूमिका साकारली होती, त्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही भूमिका केल्यानंतर शेफालीने चित्रपट सोडण्याचेच ठरवले होते.
शेफाली शाहने सांगितले की, फिल्म इंडस्ट्रीत एका ठराविक वयानंतर महिलांना केवळ आई-काकीच्या भूमिका देऊ केल्या जातात. तर ५० वर्षांचा अभिनेता मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळतो. शेफाली म्हणाली, ‘वक्त या चित्रपटामध्ये मी अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती, तेव्हा मी केवळ २८ वर्षांची होते. त्यानंतर मी ठरवले होते की, माझ्या मनाप्रमाणे भूमिका नाही मिळाल्या, तर मी काम न करता घरी बसेन.’ वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शेफाली लवकरच जंगली पिक्चर्सचा कॉमेडी ड्रामा चित्रपट डॉक्टर जीमध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करत आहे.