जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंचे वर्चस्व सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला मोठा धक्का

सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला मोठा धक्का
कणकवली – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी शुक्रवारी झाली. या निवडणुकीत नारायण राणे यांच्या पॅनलने पूर्ण वर्चस्व राखत बँकेची सत्ता हस्तगत केली. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणानंतर या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले असून, जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरून जोरदार वाद सुरू आहे, मात्र आता भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने १९ पैकी अकरा जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

सहकारी पणन संस्था, शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे, तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाले असून, महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ असल्याने याठिकाणी भाजपला धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलला ११ तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला ८ जागांवर विजय मिळाला आहे.
यावेळी कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली होती. समसमान मते पडल्यानंतर चिठ्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते, तर औद्योगिक संस्था, मजूर संस्था, जंगल कामगार संस्था, मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण १४ विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे होते. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …