जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत केली रद्द


माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील नाराज
पुणे – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. ही बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानेआढळराव पाटील यांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले.
१६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्तपरवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुणेजिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी बैलगाडा शर्यती होणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सनेजाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या या निर्णयावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आढळराव पाटलांचे ठिय्या आंदोलन
बैलगाडा शर्यत अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी मी भरविलेली बैलगाडा शर्यत हणून पाडली. ही मोठी शर्यत होईल आणि माझं नाव मोठं होईल म्हणून ही खेळी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अचानक शर्यत रद्द झाल्याने बैलगाडा मालक-चालक, शौकीन नाराजी व्यक्त करतायेत. जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी काल सायंकाळी सहा वाजता अहवाल मागवला. तेव्हा त्यांनी शर्यतीला संमती दिली आणि रात्री उशिरा अचानक शर्यतीला स्थगिती दिली. यावेळी पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

बैलगाडा शर्यती बाबत सर्वांनी नियमांचे पालन करावे :अजित पवार
शिक्रापूर -कोरोनाचे संकट जगावर आलेले आहे.आपल्याला माणसाच्या जीवाशी खेळता येणार नाही, बैलगाडा शर्यती सुरु करण्याचे आदेश आलेले आहेत, मात्र शर्यती बाबत सर्वांनी नियमांचे पालन करावे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.कोरगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी शर्यती अथवा कार्यक्रम यावर न्यायालयाने परवानगी देताना अट घातली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायचे आदेश दिलेले आहे, मात्र जिल्हाधिकारी यांना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तंतोतंत करावी लागते. माझे सर्वांना आवाहन आहे असे सांगत फक्त शिवाजीराव आढळराव पाटील यांना माझे आवाहन नाही, असे म्हणत सर्वांनी नियमांचे पालन करावे,असे आवाहन पवार यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …