जिम आणि ब्युटी-पार्लरवरील निर्बंध अखेर मागे

  • सुधारित आदेशात ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

मुंबई – सुधारित नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटी-पार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. ५० टक्के क्षमतेने जिम आणि ब्युटी-पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जिम आणि ब्युटी-पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्युटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी-पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी-पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती; पण जिम आणि ब्युटी-पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता; पण अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे, तर हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, असे शनिवारच्या आदेशात म्हटले होते. ते आदेश कायम आहेत. हेअर कटिंग सलून रोज रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटिंग सलून्सनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे, तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे.

  • दिलेला आत्मदहनाचा इशारा

दरम्यान, याआधी जिम बंद ठेवण्यास नाशिक जिम ट्रेनर अँड ओनर्स असोसिएशनने नकार दिला होता, तसेच रस्त्यावर उतरण्यासोबतच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला. शनिवारच्या नियमावलीत जिम व ब्युटी-पार्लर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. याबाबत जिम चालक व ट्रेनर नाराज झाले होते. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला, तर जिल्ह्यात एकूण ३५० जिम आहेत तर साडेतीन हजारांहून अधिक जिम ट्रेनर आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ येणार आहे. ५० टक्के उपस्थिती आणि दोन डोस झालेल्या व्यक्तींसाठी परवानगी द्या आणि जिम सुरू ठेवा, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …