जम्मू-काश्मीरमध्ये सात दिवसांत सहा चकमकी

नऊ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथीलतील झोलवा भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले. बडगाममधील चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याच्या वृत्ताला काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी (आयजीपी) दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह अनेक प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, ठार झालेले तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. आतापर्यंत एकाची ओळख पटली असून, वसीम असे त्याचे नाव आहे. तो श्रीनगर शहरातील रहिवासी आहे. दहशतवाद्यांकडून तीन एके ५६ रायफली जप्त करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातील झोलवा गावात शोध आणि घेरावबंदी मोहीम सुरू केली. त्यानंतर त्याचे रुपांतर चकमकीत झाले.
यापूर्वी बुधवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम गावाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी चकमक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या एका आठवड्यात काश्मीर खोऱ्यात सहा चकमकी घडल्या. त्यात सुरक्षा दलाने ९ दहशतवाद्यांना ठार केले. त्यात लष्कर या दहशतवादी संघटनेच्या एका प्रमुख कमांडरसह चौघे मूळचे पाकिस्तानी दहशतवादीही होते.
एका आठवड्यात दोन चकमकी श्रीनगर जिल्ह्यात, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात प्रत्येकी एक आणि आता मध्य काश्मीरमधील बडगाममध्ये एक अशा सहा चकमकी झाल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …