बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अधिक संसर्गजन्य डेल्टा व्हेरिएंटने जोरदार थैमान घातले असून, उत्तर-पूर्व डालियान शहरात डेल्टाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक निर्बंधांबरोबर शहरातील विद्यापीठात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, तसेच तेथील तब्बल दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.
चीनच्या डालियानसह २१ प्रांतांत डेल्टा स्वरूपाने हात-पाय पसरले आहेत. डेल्टाचा वेगाने प्रसार होत असल्याने चिनी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. महामारीला आळा घालण्यासाठी चीनकडून कोरोनाविरोधात शून्य धोरण राबवले जात आहे. याअंतर्गत व्यापक पातळीवर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. शिवाय मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्था बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार गत २४ तासांत आढळलेल्या नवीन ३२ रुग्णांपैकी २५ रुग्ण हे डालियान प्रांतातील आहेत. चीनमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान एकूण १३०८ रुग्ण आढळले आहेत. उन्हाळ्यातील डेल्टा उद्रेकानंतर आढळलेल्या १२८० रुग्णांपेक्षा ही संख्या जास्त आहे. डालियान शहरातील झुआंगे विद्यापीठातील अनेक रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले. जवळपास १५०० विद्यार्थ्यांपैकी काही जणांना वस्तीगृह, तर काही जणांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी डिजिटल पद्धतीने वर्गांना हजेरी लावत आहेत. विद्यार्थ्यांना जेवण देखील त्यांच्या रूममध्येच पाठवले जात आहे. डालियान शहरातून बाहेर प्रवास करत असलेल्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जात आहे.