चला किल्लेदार होऊया


सर्वप्रथम सर्व वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि आमच्या हितचिंतकांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा! दिवाळी ही आपली आनंदाची पर्वणी असलेला उत्सव. सगळीकडे लखलखाट करणाºया पणत्या. टांगलेला आकाशदिवा. दारासमोर काढलेल्या रांगोळ्या. फराळाचे भरपूर जिन्नस आणि या सर्वांबरोबरच महाराष्ट्रातल्या दिवाळीचे वैशिष्ठ्य असते ते म्हणजे किल्ले.

गड, किल्ले, डोंगर ही महाराष्ट्राची आभूषणे आहेत. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेले हे गड, किल्ले आणि त्यावर असलेला मावळ्यांचा वावर हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणूनच महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले बनवण्याची संस्कृती रूजली. महाराष्ट्राच्या या संस्कृतीचा गौरव करण्यासाठीच यावर्षी दैनिक मुंबई चौफेरने राज्यस्तरीय किल्ले स्पर्धा घेतली आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर आकर्षक बक्षीसेही दिली जाणार आहेत, म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी किल्लेदार होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मुलांनी बनवलेले सुंदर किल्ले सर्वांना आनंद देणारे असतातच; पण त्याहीपेक्षा त्यांच्यातील सृजनशीलतेची जाणीव करून देणारे असतात. यातूनच चांगले वास्तुतज्ज्ञ, स्थापत्य शास्त्रज्ञ, कलाकार निर्माण होऊ शकतात, कारण ही या मातीची खºया अर्थाने असलेली प्रेरणा आहे. आपल्या निर्मितीचा आनंद घेणे आणि तो सर्वांना वाटणे यासाठी हे किल्ले फार महत्त्वाचे असतात. या किल्ल्यांमुळे आपला संबंध पुन्हा दगड, मातीशी येतो. मातीपासून लांब होत चाललेल्या पिढीला मातीवर, पुन्हा जमिनीवर खेळायला लावणारा हा सण असतो.

अनेक जण खूप सुंदर किल्ले बनवतात. काही जण खºया किल्ल्यांच्या प्रतिकृती करतात, तर कोणी काल्पनिक किल्ले बनवतात. त्या किल्ल्यांभोवती तयार झालेले गाव. त्या गावातील छोट-छोटी कागदी घरे, रस्ते, शेती, प्राणी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे वातावरण, किल्ल्यावर असणारे मावळे आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा त्यावर सिंहासनाधिष्टीत असलेला पुतळा आपल्याला आनंद देणारा असतो. किल्ले पाहताना आपण रमून जातो. मोठी माणसेही आपल्या बालपणात जातात आणि त्यांच्या लहानपणी ते कसे किल्ले बनवत होते या रम्य आठवणीत गुंततात. किल्ल्यावर येणारे हळीव, मोहरीचे हिरवे थर, रंगाने दिलेली झलक हे फार सुंदर असे आनंददायी असते. यात कल्पकतेला आणि कलेला वाव असतो. यासाठीच ही स्पर्धा घेऊन आपल्या संस्कृतीचा गौरव करण्याचे यावर्षी दै. मुंबई चौफेरने ठरवले आहे. आपल्या बालगोपाळांनी बनवलेल्या किल्ल्यांचे जास्तीत जास्त फोटो दै. मुंबई चौफेरकडे पाठवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पालकांनी करावे, ही अपेक्षा आहे.
गेल्यावर्षीची दिवाळी ही कोरोनाच्या संकटातील होती. त्याचा मनासारखा आनंद घेता आला नव्हता. त्यामुळे अनेकांनी गेल्यावर्षी किल्ले बनवले नव्हते. धूळ, मातीला घाबरून, मातीतून संसर्ग होईल या भीतीने अनेकांनी मातीशी नाते दूर केले होते. यासाठी यावर्षीच्या दिवाळीत हे मातीचे नाते पूर्ववत करण्यासाठी सर्वांनी किल्ले संस्कृती जपावी आणि प्रत्येकाने आपल्या घरचे किल्लेदार व्हावे.

खरं तर ही किल्ल्यांची परंपरा केव्हा सुरू झाली, हे सांगता येणे कठीण आहे. त्याचा इतिहासही कुठे उपलब्ध आहे की नाही, समजत नाही. महाराष्ट्रात दिवाळीत सर्वात प्रथम किल्ले कोणी बनवले होते, याचे संशोधन होण्याची गरज आहे, म्हणजे आपण म्हणतो की, सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. तसे दिवाळीत हे किल्ले बनवायला कोणी प्रारंभ केला याचा इतिहास पुढे येण्याची गरज आहे. अर्थात ही परंपरा गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षांतच झाली असावी असे वाटते; पण याची प्रेरणा कुठे तरी श्रीकृष्णाशीही जोडलेली असावी. बालपणातच श्रीकृष्णाने इंद्राचा गर्वहरण करण्यासाठी गोपालांनी इंद्रपूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करावी, असे सांगितले होते. हा गोवर्धन पर्वत म्हणजे त्यावर येणारे गवत खाऊन आपल्या गायी धष्टपुष्ट होतात. गायींना वर्धन करणारा असा हा पर्वत असल्याने त्याची पूजा केली पाहिजे. या गायींमुळे आपल्याला दुधदुभते मिळते. त्यामुळे हे सगळे बालगोपाळ मोठे होतात, म्हणून गायींची आणि गोवर्धनाची पूजा केली पाहिजे, तो आपला रक्षक आहे, हे सांगितले होते. आपली पूजा होणार नाही हे समजल्यावर संतापलेल्या इंद्राने प्रलय घडवण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर पाऊस पाडला होता. त्यावेळी कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला असे म्हणतात; पण त्यामागचे प्रतिक लक्षात घेतले पाहिजे की, कितीही संकट मोठे असले, तरी ते एकजुटीच्या बळावर दूर करता येते. सगळे एक झाले आणि अख्खा गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याखाली सगळे सुरक्षित राहिले.
हे किल्लेच आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी सहाय्यभूत राहतील हे छत्रपतींनी ओळखले होते, म्हणूनच महाराष्ट्राची खरी ताकद हे गड, किल्ले आहेत. औरंगजेबाने, मोगल बादशहांनी नेहमीच महाराजांच्या या किल्ल्यांवर डोळा ठेवला होता. मराठा साम्राज्याचे ते बलस्थान आहे हे मोगलांनी ओळखले होते, म्हणून हा ठेवा आपण संवर्धन करण्यासाठी दिवाळीत किल्ले महोत्सव साजरा करायचा असतो. मोगलांनंतर सत्तेवर आलेले राज्यकर्ते म्हणजे ब्रिटिश. ब्रिटिशांनीही या डोंगर पर्वतांवर डोळा ठेवला होता. अनेक हिल स्टेशन बनवून या किल्ल्यांवर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान अशी हिल स्टेशन ब्रिटिशांनी ताब्यात ठेवली होती. त्यांनाही महाराजांच्या या गड, किल्ल्यांचे महत्त्व जाणून घ्यायचे होते यासाठीच, म्हणूनच महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या गड, किल्ल्यांचा महोत्सव म्हणजेच दै. मुंबई चौफेरतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धा आहेत. या महोत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे.

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …