ठळक बातम्या

घराघरात हवी ‘श्यामची आई’

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठ्यांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे, वगैरे वगैरे म्हणजे संस्कार; पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज, म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे काही वारसाहक्काने ट्रान्स्फर होणारे नाहीत. संस्कार हे एका पिढीतून दुसºया पिढीत रूजवायचे असतात. नेमके हेच काम कित्येक दशकांपूर्वी साने गुरूजींनी केले होते. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी श्यामची आई रूपाने लिहून ठेवला आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. बिगरमराठी माणसांना त्यातील महत्त्व समजावून सांगितले पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्रातील उच्च संस्कार सर्व देशाला समजतील. आज व्यसनाधिनता आणि ड्रग्जचे रॅकेट आणि नवी पिढी तयार होत असताना, त्यांना एनसीबी वाचवणार नाही, तर श्यामची आईसारखी संस्कारक्षम पुस्तके वाचवतील हे लक्षात घेतले पाहिजे. आपली मुलं का बिघडली, तर आपले संस्कार कुठे तरी कमी पडले, याचा विचार करण्याची वेळ आहे.
श्यामची आई हे पुस्तक वाचले नाही, अशा माणसाला मराठी म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. नाशिकला जेलमधे असताना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसांत लिहून काढल्या. रूढ अर्थानं हे लिखाण काही आत्मचरित्र, कादंबरी किंवा निबंधही नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहिलेल्या आईच्या आठवणी आणि अंत:करणापासून आईला वाहिलेली श्रद्धांजली. श्यामची आई पुस्तकावर किती तरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या.

१९५३ साली आचार्य प्र. के. अत्र्यांनी या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता. ही भूमिका माधव वझे यांनी केली होती, तर आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार म्हणजेच वनमाला होत्या. हा चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला, तरी एकदा पाहिलेल्या या चित्रपटाचा इम्पॅक्ट (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो. जेवढ्या ताकदीने साने गुरूजींनी हे पुस्तक लिहिले आहे, तेवढ्याच ताकदीने आचार्य अत्रे यांनी त्याची निर्मिती केलेली होती.
या पुस्तकात आणि चित्रपटात एक दृश्य आहे. आंघोळ झाल्यावर श्याम आपल्या आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते, श्याम, जसे पायाला घाण लागू नये, म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुद्धी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहेत. केवढे मोठे तत्वज्ञान किती सोप्या भाषेत सांगितले आहे? संस्कार हे ठरवून, ठराविक वेळी करायचे नसतात, तर ते योग्यवेळी आणि सहजपणे जाता जाताही करता येतात. बोलण्याच्या ओघात ते करता येतात. संस्कार करताना सकारात्मकता असली पाहिजे. सकारात्मकता म्हणजे काय? तर आपल्याकडे लहान मुलांना शिकवताना घरातील आई, वडील, मोठी माणसे, हे करू नये, ते करू नये, इकडे जावू नकोस, तिकडे जावू नकोस. अमुक एक करू नकोस. तमुक एक चांगले नाही. असे सतत सांगून फक्त नकारात्मक गोष्टींचा भडीमार करतात; पण अमुक एक गोष्ट करू नये, याचा अर्थ नेमके काय करावे हे सांगण्याचीही जबाबदारी असते. इथेच पालकवर्ग कमी पडतो, म्हणून जनरेशन गॅप निर्माण होते. श्यामची आई पुस्तकातून साने गुरूजींनी नेमके हेच जपले आहे. सकारात्मकतेने संस्काराचे धन दिले आहे, म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरते.

या पुस्तकात भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठ्याने भजन म्हणतो, तेव्हा आई त्याला म्हणते, देवाची भक्ती ही मोठ्याने नाही, तर हृदयातून केली तरच देवापर्यंत पोहोचते. लहान मुलांचा अल्लड स्वभाव असतो. त्यांना रागावून सांगण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगितले, तर ते कायमचे लक्षात राहते. श्यामच्या आईने ते जपले होते. त्यामुळेच श्यामची आई संस्कार करण्यात सक्षम ठरले. या पुस्तकात बंधू प्रेमाचे धडे अतिशय सुरेख आहेत. पोहायला जात नाही, म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळ्या न तोडू देणारी आई, दलित असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, म्हणून कष्ट करणारी श्यामची आई, हे फार मोठे संस्कारधन आहे. साने गुरूजींनी ४५ भागांत या कथा लिहून काढल्या आहेत. छोट्या छोट्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा या गोष्टी आहेत.
काळ बदलला तशी माध्यमेही बदलली आणि अधिक प्रभावी झाली. २००४ साली श्यामची आईला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रूद्रा व्हिडीओने या चित्रपटाची व्हिसीडी/डिव्हीडी उपलब्ध करून देऊन मोलाची कामगिरी केली आहे. डिव्हीडीमध्ये, तर वनमालाबार्इंवर अत्यंत माहिती पूर्ण डॉक्युमेंटरी आहे. वाचनाची आवड कमी झालेल्या या पिढीसाठी व्हिसीडी/डिव्हीडी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्याबरोबर श्यामची आईचे इंग्रजीत रूपांतर केले आहे, ते व्ही. रामकृष्णन यांनी. पुण्यात ७४ वर्षांचे पुराणिक आजोबा एक हाती घरोघरी जाऊन श्यामची आई पुस्तकाची विक्री करायचे. एखाद्या दिवशी पुस्तके विकली गेली नाही, तर संध्याकाळचे जेवण ते घ्यायचे नाहीत. इतकी त्यांची श्यामच्या आईवर निष्ठा होती. त्यांनी घरोघर जावून पाच हजारपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री केली आहे. यामागचा हेतू एकच होता, तो म्हणजे संस्काराचे धन योग्य हातात योग्य वेळी पडले पाहिजे. त्यासाठी आपल्यानंतरही हे काम कोणीतरी करावे असे त्यांना वाटत असे.

श्यामच्या आईला सत्तर वर्षे झाली असली, तरी अजूनही रसिकांच्या मनात चित्रपटाच्या आठवणी आणि आईच्या संस्कारांचा पगडा आहे. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. इथून पुढे येणाºया काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल, कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते. हे संस्काराचे धन प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे.
आपल्या घरात जशी धार्मिक पुस्तके, पोथ्या असतात त्याप्रमाणे श्यामची आई हे पुस्तकही प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा वैभवलक्ष्मी नामक शुक्रवारची व्रते करून वैभव प्राप्त करण्याची कामना बाळगणाºया भाबड्या आया-बहिणींना सांगावेसे वाटते की, अशी व्रते केल्यानंतर त्याची भाकड कथा असलेली पुस्तके हळदी-कुंकवाला बोलावून वाटली जातात. त्या पुस्तकांपेक्षा श्यामच्या आईचे एक पुस्तक वाटले तर फार मोठे संस्कारधन प्रत्येकाच्या घरात जमा होईल.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …